कात्रज – समाविष्ट गावांतील शिक्षण सरकारी लाल फितीत अडकल्याचे दिसत आहे. शाळा हस्तांतरास महापालिकेकडून विलंब होत असल्याने कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेकडून शाळा हस्तांतराची तयारी दर्शविण्यात येते.
मात्र, कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय हे काम होणार नसल्याचे महापालिकेने सांगितले. यामध्ये विद्यार्थ्यांचे हाल होत असून दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
समाविष्ट गावातील भिलारेवाडीत पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून, येथे पाच वर्गांसाठी चार शिक्षक आहेत. जांभूळवाडीतील शाळा ही खासगी जागेत असून शासकीय जागेसाठी महापालिकेने खर्च करणे अपेक्षित आहे. गुजर-निंबाळकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक आहेत. नवीन खोल्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही मार्ग निघत नाही.
मांगडेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यात आयुषमान भारत अंतर्गत दवाखाना चालविण्यात येत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांचे आजार विद्यार्थ्यांना जडू शकतात. अशाप्रकारे सर्वच समाविष्ट २३ गावांतील शाळांच्या वेगवेगळ्या व्यथा आहेत. मात्र, केवळ हस्तांतरण न झाल्याचे कारण सांगून महापालिका खर्च करत नाही आणि जिल्हा परिषदेकडून शाळा महापालिकेच्या ताब्यात जाणार असल्याने खर्च करण्यात येत नाही. यामध्ये विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय होत आहे.
सद्यःस्थितीत शाळा या जिल्हा परिषदेच्याच ताब्यात आहेत. शाळा हस्तांतर करून घेण्यासंबंधी सहकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र, सर्व कागदपत्रांची पूर्तता, जागांचे नकाशे आदी गोष्टी तपासण्याचे काम वेळखाऊ आहे. त्यामुळे विलंब होत आहे. मात्र, लवकरात लवकर सर्व गोष्टींची पूर्तता करून शाळा हस्तांतर केल्या जातील.
– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
गुजर-निंबाळकरवाडीच्या शाळेच्या वर्गखोल्या धोकादायक जाहीर करून चार वर्षे उलटली, तरी प्रशासन केवळ वेळकाढूपणा करत आहे. अशाप्रकारे टाळाटाळ करायचीच होती, तर मग गावांचा महापालिकेत समावेश केवळ करआकारणी करण्यासाठी केला का?
– गणेश काळे, माजी उपसरपंच, गुजर-निंबाळकरवाडी
समाविष्ट गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतर करून देण्यास आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. महापालिकाही याबाबत सकारात्मक आहे. मात्र, काही कारणास्तव यास विलंब होत असून लवकरात लवकर शाळा हस्तांतर व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील आहोत.
– रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
शाळा हस्तांतरास विलंब होत असल्याने अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.