अहमदनगर : अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादतून पिंप्री निर्मळ (ता. राहाता) या गावात जमावाने दोन दलित कुटूंबांच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात ७१ जणांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या गावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. शिर्डीचे उपाधिक्षक संदिप मिटके तपास करीत आहेत.
पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटांतीस तरुणात वाद झाला होता. त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. यानंतर गाव बंद ठेवून निधेष करण्यात आला. त्यानंतर एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दलित कुटुंबांच्या घरी जाऊन गाव सोडून जाण्याचा गावकऱ्यांचा निरोप असल्याचे सांगतिले. त्यावेळी शारदा कोळगे, पती सुधाकर कोळगे, मुलगा मनोज कोळगे, सून प्रियंका कोळगे हे सर्वजण घरात होते. काही वेळात सुनील मुरलीधर घोरपडे, सचिन भाऊसाहेब घोरपडे, राजेंद्र दिंगबर निर्मळ यांच्यासह ७१ जणांनी घरावर हल्ला चढवीला. घराचे नुकसान केले. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रिपब्लीकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी या कुटुंबांची भेट घेत घटनेचा निषेध केला.