Thursday, July 25, 2024

मंत्रालयात नोकरी लावतो; तरुणांना आमिष दाखवलं, लाखोंचा गंडा घातला, नंतर पलायन

बीड: आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडून २ लाख ९० हजार रूपये घेतले. मात्र नोकरी दिली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला. अर्ज चौकशीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सागर भरत मगर (२५, रा. देऊळगाव घाट, ता. आष्टी,जि. बीड) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गौरव दादासाहेब नरवडे (रा. खातगाव टाकळी, ता. नगर) आणि प्रवीण तान्हाजी राडे (रा. मुंबई, पूर्ण पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मगर हे नगर शहरातील एका कॉलेजमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असून त्यांची गौरव नरवडे याच्याशी ओळख आहे. ८ जून २०२२ रोजी नरवडे हा मगर यांच्याकडे आला. त्यांना म्हणाला की, माझी ओळख मंत्रालयातील प्रवीण तान्हाजी राडे यांच्याशी असून त्यांच्यासोबत माझे बोलणे झाले असून माझ्या बरोबर तुलाही आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो, असे सांगितले.८ जून रोजी मगर आणि नरवडे हे दोघे राडे याला नगर शहरातील सक्कर चौकातील हॉटेलमध्ये भेटले. त्यावेळी राडे याने मगर यांना सांगितले की, मी मंत्रालयात कामाला असून मी अनेक लोकांची कामे नेहमी करत असतो. माझी सर्व मंत्र्याशी ओळख आहे. तुमचे दोघांचे काम मी ताबडतोब करून देतो. तुम्ही मला पाच लाख रूपये द्या. मी गौरव नरवडे यांच्याशी चर्चा करून तुम्हाला सांगेन. माझे सर्व पैसे गौरव नरवडे यांच्याकडे जमा करा, असे सांगितले. मगर यांनी विश्वास ठेऊन १ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन आणि १ लाख ४० हजार रूपये रोख स्वरूपात असे एकूण २ लाख ९० हजार रूपये नरवडे याला दिले. नरवडे याने राडे याच्या खात्यावर पैसे पाठविले. राडे याने मगर यांना नोकरीला न लावता व घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang