हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील वाघी सिंगी शिवारामध्ये कोर्टा येथील मेंढपाळांच्या मेंढ्यांना विषारी चाऱ्यातून विषबाधा झाल्याने २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान या मेंढपाळांचे झाले आहे. या घटनेत ४० मेंढ्यांना विषबाधा झाल्याने डॉक्टरांनी मागील दोन दिवसापासून उपचार सुरू केले आहेत. मेंढपाळ विष्णू भाऊराव आव्हाड व नारायण आव्हाड यांनी आपल्या मेंढ्या चारण्यासाठी औंढा तालुक्यातील शिरला शिवारामध्ये ८ डिसेंबर पासून आणलेल्या होत्या.दिवसभर मेंढ्या चारल्यानंतर रात्री वाघीशिंगी शिवारात त्या मुक्कामी थांबलेले असताना आणि दिवसभरात विषारी चारा खाल्ल्याने रात्री उशिरा मेंढ्या तडफडत असल्याचं मेंढपाळांच्या लक्षात आले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने व उपचाराची कुठलीच सुविधा नसल्याने ४० मेंढ्या विषबाधेने तडफडत होत्या. जास्त विषबाधा झाल्याने २३ मेंढ्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.यामध्ये मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. मेंढ्यांना विषबाधा झाली हे कळताच घटनास्थळी हिंगोली जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे पथक दाखल झाले. मात्र, तोपर्यंत २३ मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अधिकारी डॉ. सखाराम खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विषबाधा झालेल्या मेंढ्यांची तपासणी केली आणि मृत्यूमुखी पावलेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर या मेंढ्यांना विषबाधा कशातून झाली याच नेमके कारण कळणार आहे.
सध्या रब्बीची कोवळी पिके असून अवकाळी पावसाने सोयाबीन व इतर पिके उगवली आहेत व काही ठिकाणी शेतकरी तननाशक आणि कीटकनाशक फवारत आहेत. ही कोवळी पिक खाल्ल्यामुळे मेंढ्यांना विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जात आहे. यावेळी पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश राठोड वाई गोरखनाथ, डॉ. नागार्जुन सोनवणे. डॉ. खेडकर, डॉ. खिल्लारे, डॉ. बोलपेलवार, डॉ. टाकळकर, डॉ. पडोळे, डॉ. धुळे, डॉ. झनकवडे आदींनी घटनास्थळी भेटी दिल्या आहेत व अजूनही या उर्वरित मेंढ्यांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.