मुंबई : राज्यात रस्ते अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वारंवार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे अपघातही वाढत आहेत. अशात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांना आता पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. वाहनचालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आता लोकअदालतीची स्थापना करत आहेत.
प्रलंबित ई-चलनाची रक्कम भरणा करून घेण्यासाठी तब्बल १७.१० लाख वाहन चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. आतापर्यंत यातून १४.९२ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर शनिवारी एकाच दिवशी ८५० जणांनी २८,२१,३०० रुपयांचा दंड भरला. जे कोणी दंड भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
असे भरा ई-चलन….
ई-चलन रकमेशी संबंधित सर्व माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवली आहे. वाहन मालक ऑनलाइन किंवा जवळच्या वाहतूक पोलीस चौकीत जाऊन तो मेसेज दाखवत दंड भरू शकता. तर तुम्ही मुंबई पोलिसांची वेबसाइट trafficpolicemumbai.maharashtra.gov.in, MTP अॅप आणि ट्रान्सपोर्ट पोर्टलचीही मदत घेऊ शकता.