जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार शहरात विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत.दरम्यान, गोळीबार प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मंठा रोडवरील रामनगर साखर कारखाना परिसरात एका आरोपीला मौजपुरी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांनी हाती घेतलं असून घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट श्वानपथकाच्या सहाय्याने आरोपीचा मागवा काढण्यात येत आहे. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत .भरदिवसा झालेल्या या गोळीबारानंतर मंठा चौफुली भागात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट त्याचबरोबर श्वानपथकाच्या सहाय्याने पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, तालुका पोलीस, सदर बाजार पोलीस, कदीम जालना पोलीस, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले आहेत.
मंठा चौफुली भागामध्ये गजानन तौर याच्यावर झालेल्या गोळीबारानंतर पोलीस अलर्ट मोडवर आले असून, पोलिसांनी cctvच्या आधारे जालना मंठा रोडवरील रामनगर साखर कारखाना येथे एका कारचा पाठलाग करून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या कारवाईत दुसरा आरोपी पळून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.