कळे: आंबर्डे (ता.पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आनंदा यशवंत कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. आक्काताई पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कळेचे मंडल अधिकारी सुरेश ठाकरे यांनी काम पाहीले. तर उपसरपंचपदी नम्रता अमित कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच गीता प्रकाश कांबळे यांचे सदस्यत्व अपात्र झाल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये नम्रता कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आक्काताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी सर्व ग्रा.पं.सदस्य, पोलिस पाटील रामदास पाटील, तंटामुक्त अध्यक्ष महादेव पाटील, बाबूराव कांबळे, भिकाजी कांबळे, कोंडीबा कांबळे आदींसह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेविका श्रेया पाटील यांनी आभार मानले.