Solapur News: येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून सिटीस्कॅन मशीनच नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ते मिळाले नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
दुसरीकडे महिला व बालकांसाठी १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय बांधून तयार आहे, पण फर्निचरच्या किरकोळ कारणांमुळे ते सुरू होत नाही, यावर आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिवेशनात बुधवारी (ता. १३) आवाज उठविला.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषधे नाहीत, अशी एकही तक्रार माझ्याकडे नाही. जरी तशी काही मागणी असल्यास त्याची आठ दिवसांत पुर्तता केली जाईल, अशी ग्वाही दिली.
त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, माझ्या प्रश्नातील काय लागले हे माहिती नाही. मात्र, मी मुख्यमंत्र्यांसह वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सचिवांना पत्र दिले. तरीसुद्धा त्याची पूर्तता झाली नाही म्हणून मंत्र्यांना हा प्रश्न विचारला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांनी दिलेली चुकीची माहिती रेकॉर्डवरून काढून टाकावे, अशी विनंतीही केली. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आमदाराने पत्र दिल्यावरच काम करावे, असा कोणताही नियम नाही. आमदार प्रणिती शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांचे स्पेसेफिक उत्तर द्यावे, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले. तर चुकीचे काही असेल तर ते रेकॉर्ड तपासून काढले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
Users Today : 23