जालना : सोमवारी गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली. त्यांचे मित्र जालन्याहून जवळच असलेल्या पिरकल्याण धरणावर गेले होते. धरणाहून परत येत असताना सुमारे दुपारी दीड वाजता जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात एका मेडिकलसमोर गेल्यानंतर तौर यांची गाडी थांबली. गजानन तौर खाली उतरले आणि पुढे जे घडायला नको होतं तेच घडलं…हत्येच्या दिवशी घटनास्थळी काय घडलं
जालन्यात सोमवारी भरदिवसा गजानन तौर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दिवशी मंठा चौफुली परिसरात नेमकं काय झालं होतं? काही प्रत्यक्षदर्शी यांच्या सांगण्यानुसार गजानन तौर यांनी गाडी थांबवून ते खाली उतरले. खाली उतरून संशयित आरोपी भागवत डोंगरे, लक्ष्मण गोरे, टायगर (नाव माहिती नाही) यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आरोपींनी गजानन तौर यांच्यावर गोळ्या झाडल्या.दोन गोळ्या झाडल्यानंतरही गजानन तौर यांनी आरोपीशी दोन हात केले. त्यातील एका आरोपीने गजानन तौर यांच्यावर परत चाकूने वार केला. दोन गोळ्या लागून देखील गजानन तौर यांनी तो चाकू त्याच्याकडून खेचून एकाच्या पोटात चाकूने वार केला. लगेचच एक गोळी गजानन तौर यांच्या डोक्यात लागल्यामुळे ते तिथेच कोसळले. असं काही प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं. जुन्या वादातूनच गजानन तौर यांचा गोळ्या झाडून खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गजानन तौर यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी लक्ष्मण गोरे, रोहित ताटीमापुलवार हे पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना न्यायालयाने १० दिवसांची २२ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर संशयित आरोपी भागवत डोंगरे याच्यावर चाकूने वार झाल्याने त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तर टायगर नावाचा आरोपी फरार आहे. या प्रकरणात पहिल्या दिवशी तौर यांच्याकडील माऊली उर्फ ज्ञानेश्वर मांगडे याने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान, भागवत डोंगरे आणि गजानन तौर यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद होता. ११ डिसेंबर रोजी भागवत डोंगरे, टायगर, रोहित ताटीमापुलवार हे मंठा चौफुली येथे नाश्ता करण्यासाठी गेले होते. नाश्ता झाल्यानंतर एका लिंबाच्या झाडाखाली ते थांबले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास गजानन तौर यांची गाडी तिथे आली. त्यावेळी शाब्दिक चकमकीनंतर डोंगरे याने तौर यांच्यावर गोळ्या झाडल्या.