पालघर : सौरभ कामडी *
मोखाडा : दि. 22 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिनाचे औचित्य साधून मोखाडा तालुक्यात आरोहनतर्फे आज किसान दिन उत्साहात साजरा केला गेला. आदिवासी बांधवांच्या उत्थानाचे कार्य करणारी आरोहन या सामाजिक संस्थेद्वारे मोखाड्यात आज किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोखाडा परिसरातील जवळपास पन्नास शेतकरी बांधव उपस्थित होते. या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. या विशेष कार्यक्रमात शेतकऱी, आरोहनचे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकरी नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शेतकऱ्यांना शेतीविषयक, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ, जव्हार तालुक्याचे रेशिम अधिकारी सारंग सोरते, आयपीएत बायोलॉजिकल कंपनीचे अनिल चिटणीस, तालुक्याचे कृषी मंडळ अधिकारी पी. डी. राठोड, साखरीचे संरपंच प्रकाश भोंडवे, आरोहनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नारकर, प्रकल्प व्यवस्थापक नितेश मुकणे आणि आरोहनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या संघर्षांची कहानी स्वतः सांगितली. “शेतकऱ्यांनी नेहमी प्रयोगशील राहावे. एकच पीक न घेता नवनवीन प्रयोग करावे, त्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. आम्ही शक्य ती मदत करु ” असं आश्वासन उपसभापतींनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं. तर “आरोहन संस्था शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. मोखाड्यातील शेतकऱ्यांच्या सहकाऱ्यामुळेच आपण चांगलं काम करु शकलो. ज्यावेळी शेतकऱ्यांना कुठल्याच संस्थेच्या साहाय्याची गरज भासणार नाही, शेतकरी स्वयंभू होईल त्याचवेळी तो आरोहनचा पुरस्कार असेल.” असं मत आरोहनचे सी ईओ अमित नारकर यांनी व्यक्त केलं.