प्रतिनिधी विशाल गवई अकोट
पादुका संस्थान मुंडगाव द्वारा दरवर्षी उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम मलकापूर अकोला येथील मुलींची दिवाळी भाऊबीज साजरी करण्यात येते. या मुलींना मुंडगावाला आमंत्रित केल्या जाते. संतनगरी मुंडगाव हे त्यांच्या मामाचे गाव झालेले आहे. या मुलींना दरवर्षी मामाच्या गावाला जाण्याची आस लागलेली असते.
रविवारी सकाळी संस्थानाने सकाळी दहा वाजता मुलींना मुंडगावला आणले. भजनी दिंड्या व फटाक्यांच्या आतिषबाजीने विश्वस्त मंडळ व गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पादुका संस्थान हे रांगोळी, आकाश दिवे व लाइटिंग हार फुलांनी सजवल्या गेले. मंदिर आवारात आल्यावर मुलींचे पाद्यपूजन करून त्यांना गर्भागृहातून पादुका दर्शन करण्याचा मान दिला. नंतर मिष्ठांन भोजन झाल्यावर विहीर संस्थान पोपटखेड येथे दर्शन व विरंगुळा म्हणून पाठविण्यात आले.
भारुडाचा कार्यक्रम श्री कैलास खडसान यांनी सादर केला. त्यांना समाधान महाराज, श्री गोपाल भंडारे बंधू यांची संगत लाभली. त्यानंतर गायत्री बालिकाश्रम च्या मुलींनी गीत सादर केले. मुलींकरता संस्थांनचे व्यवस्थापक श्री महेश गाढे यांनी श्री गजानन महाराजांवर स्वयंरचित गीत गायन केले.
यानंतर संध्याकाळी मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला सप्त खंजेरी वादक श्री सत्यपाल महाराज चिंचोळकर, श्री शुकदास महाराज, गुरुदेव सेवाश्रम पाटसुल, सौ मीराताई जोशी व श्री सुधाकर गीते संचालक गायत्री बालिकाश्रम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह भ प श्री गजानन महाराज हिरुळकर पिंपळोद हे होते.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थांन चे कोषाध्यक्ष विजय ढोरे यांनी केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून पादुका संस्थानला नेहमी मदत करणारे मंगल कार्यालयाचे संचालक मुंडगावातील श्री प्रमोद लहाने व श्री केशवराव दहिभात यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मुंडगावला विविध शिक्षण संस्थांची निर्मिती करून शिक्षणाची विकास गंगा आणणारे श्री मिलिंद देशमुख यांचा सुद्धा मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थांनचे अध्यक्ष विलास बहादुरे, व्यवस्थापक महेश गाढे, विश्वस्त गणेश कळसकर, ज्वारसिंग आसोले, शरद सोनटक्के, गणेश ढोले, डॉ. प्रवीण काळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री गाडेकर दादा, श्री गीते साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री सत्यपाल महाराज यांच्या बहारदार भाषणाने रंगत आली.