आज सातारा जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) व अन्य उपक्रमांचा ई- शुभारंभ, ई-भूमिपूजन व लोकार्पण मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते शिरवळ येथील श्रीपतराव कदम महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसमवेत उपस्थित राहिलो.
यावेळी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ४९ स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पीएचसी) ई-शुभारंभ आणि फलटण तालुक्यातील पवारवाडी, सातारा तालुक्यातील निनाम, कोरेगाव तालुक्यातील एकंबे आणि पाटण तालुक्यातील मारुल हवेली या ४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ई-भूमिपूजन करण्यात आले. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या ६ रुग्णवाहिकांचे वितरणदेखील यावेळी करण्यात आले. तसेच आयआय केअर फाउंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १२५ संगणकांचे वाटप याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. जिल्ह्यात ‘स्मार्ट पीएचसी’ आणि मॉडेल स्कूल यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधीची तरतूद ठेवण्याचा निर्णय घेतला असून ‘स्मार्ट पीएचसी’साठी ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जावळी, महाबळेश्वर, पाटण आदी डोंगरी तालुके, तसेच अन्य ग्रामीण भागातील पीएचसी स्मार्ट झाल्यास स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल. या उपक्रमासाठी २४० कोटी रुपये उपलब्ध झाल्यास सर्व आरोग्य केंद्रे स्मार्ट होतील. त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू आहे, असे याप्रसंगी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, पर्यटन याबाबतीत जास्तीत जास्त काम करता येईल. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यास येथील मुले मुंबई, दिल्लीच्या मुलांशी स्पर्धा करतील. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असेही यावेळी आश्वस्त केले.
याप्रसंगी इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे, आमदार मा. मकरंदजी पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज कर्पे, धैर्यशील कदम, पुरुषोत्तम जाधव आदी संबंधित अधिकारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ramesh Chavhan
Users Today : 31