बुलडाणा, दि. 29 : जिल्ह्यात जातनिहाय सर्व्हेक्षण घरोघरी जाऊन करण्यात येत आहे. यात नागरिकांशी निगडीत अन्य माहितीही घेण्यात येत आहे. नागरिकांनी ही माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रगणकाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार 306 गावांमध्ये 5 लाख 64 हजार 572 घरांपर्यंत पोहोण्यात येणार आहे. यात 28 लाख 51 हजार 802 लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. आतापय्रंत 87 टक्के सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून 4 लाख 91 हजार 67 घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या दोन दिवसात सर्व्हेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी आज जातनिहाय सर्व्हेक्षणाचा तहसिलदारांकडून आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मुख्याधिकारी गणेश पांडे आदी उपस्थित होते. यात प्रामुख्याने प्रगणकांची उपलब्धता, आतापर्यंत झालेल्या नोंदी, खुल्या प्रवर्गातील नोंदी, मराठा समाजाच्या नोंदी, सर्वेक्षणाच्या कामाची टक्केवारी आदींबाबत माहिती घेतली. तहसिलस्तरावरून दररोज सायंकाळी चार वाजता गुगल शीट मध्ये डाटा भरावा. तसेच सर्व्हेक्षणात अद्यापपर्यंत ज्या कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचून सर्व्हेक्षणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे.
यात नगरपालिका किंवा जास्त घनता असलेल्या क्षेत्रात सर्व्हेक्षण करताना मेहनत घ्यावी लागणार आहे. कमी कालावधीत जास्त कुटुंबापर्यंत पोहोचून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक सुविधा आहेत, त्यांची माहिती प्रगणकाने स्वत: भरावी. नागरी भागात कार्यालये, शाळा, दुकाने अशा ज्या ठिकाणी नागरिक उपलब्ध होतील, त्याठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात यावे. तसेच मजूर, स्थलांतरीत नागरिकांचे योग्य सर्व्हेक्षण करावे.
जिल्ह्यात खुल्या प्रवर्गातील नागरिकांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे या नोंदी घेण्याकडे प्रगणकांनी अधिक लक्ष पुरविणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्याचे सर्व्हेक्षण दोन दिवसात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले असल्याने यात सर्व यंत्रणांनी जाणिवपूर्वक काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले.