नवी दिल्ली :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दोन दिवसांचा दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच ते दिल्लीला रवाना झाले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
संसदेत किरण रिजिजू यांच्यासोबत भेट
दिल्ली दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी संसदेत केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.
या भेटीत रिजिजू यांनी विनोदी अंदाजात “श्रीकांत मेरा छोटा भाई है” असे म्हणत संवाद साधला. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पंतप्रधानांसोबत दीड तास सखोल चर्चा
या दौऱ्यात शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत जवळपास दीड तास चर्चा केल्याची माहिती दिली. या बैठकीनंतर अनेक राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
“सदिच्छा भेट, सकारात्मक चर्चा” – शिंदे
या भेटीबाबत बोलताना शिंदे म्हणाले,
“महाराष्ट्रासह इतर विषयांवर चर्चा झाली. चर्चा अतिशय सकारात्मक होती. अधिवेशन सुरू असले की मी दिल्लीला येत असतो. ही सदिच्छा भेट होती. कोण टीका करतंय यापेक्षा मला माझं काम महत्त्वाचं आहे.”
तसेच पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नेतृत्वाच्या बैठका सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Users Today : 17