मेहकर : तीन महिन्यांपूर्वी ऊसतोडणीच्या कामासाठी पाचोड (ता.पैठण) परिसरात आलेल्या महिलेस तरुणाने बेदम मारहाण केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सदर तरुणाविरुद्ध पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.१५) पोलिसांनी सदर तरुणास अटक केली. रेणुका भीमराव सुरुशे (वय ४५, रा.आंबेडकरनगर ता.मेहकर जि.बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर विक्की ऊर्फ संतोष यशवंत राऊत (रा.मेहकर (जि.बुलडाणा) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
पाचोड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जवळपास तीन महिन्यांआधी सदर महिला आणि आरोपी गावांतील आठ -दहा जण ऊसतोडीसाठी ब्रम्हगाव (ता.पैठण) शिवारात आले होते. त्यांची टोळी ऊस तोडण्यासाठी येथील शेतकरी गोपाल जगताप यांच्या शेतात वास्तव्यास असताना मृत महिलेने घरी असलेल्या मुलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र,; आरोपीने ऊसतोडणीच्या कामासाठी उचल घेतलेली रक्कम फिटेपर्यंत जायचे नाही असे सांगितले. या कारणावरून या दोघांमध्ये भांडण झाले. यामुळे मंगळवारी (ता.६) संतोष राऊतने रागाच्या भरात रात्री आठच्या सुमारास सदर महिलेला लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केली.