छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जालना (प्रतिनिधी) ः केंद्रातील मोदी सरकाराच्या सत्ता काळात सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय न घेता केवळ भांडवलदारांनाच पोसण्याचे काम झाले असल्यामुळे सरकार विरूध्द देशभरात मोठी चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे यावेळी या नाकर्त्या सरकारला सत्तेतून घालविण्यासाठी सर्वांनी संघटीतपणे प्रयत्न करावा असे आवाहन कॉग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक मा.आ. सय्यद मुज्जफर हुसैन यांनी येथे बोलतांना केले आहे.
जालना लोकसभा मतदार संघातील महाविकास (इंडीया) आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ काल बुधवार दि.1 मे रोजी जालना शहरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आ. कैलास गोरंट्याल, मौलाना आझाद महामंडळाचे मा.संचालक इब्राहीम पठाण,शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राकॉचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ॲड. सय्यद अक्रम, राजेंद्र जाधव, बदर चाऊस, रऊफ देशमुख, महाविर ढक्का, किशोर गरदास, डॉ. विशाल धानूरे, अब्दुल बासेद कुरेशी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना हुसैन म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात देशात समाजा-समाजामध्ये विष कालवण्याचे काम केले आज आहे. तर दुसरीकडे कॉग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सामान्य जनता, शेतकरी, बेरोजगार, कामगार आणि पिडीत लोकांच्या व्यथा जाणून घेण्याचे काम केले आहे. डॉ. कल्याण काळे हे लोकसभेत निवडूण आल्यास आ.कैलास गोरंट्याल हे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्री असतील असा विश्वास देखील हुसैन यांनी यावेळी व्यक्त केला. आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की शहरातील प्रत्येक भागात कॉग्रेसच्या तत्कालीन नगराध्यक्षा सौ. संगीता गोरंट्याल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील जनता कॉग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांचा विजय निश्चीत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तत्पुर्वी दुःखी नगर भागातील जमाअते ईस्लामी हिंदच्या जिल्हा कार्यालयास मा.मुज्जफर हुसैन यांनी भेट देवून पदाधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केली तसेच बुऱ्हाणनगर मधील बागवान बिरादरीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांच्याशीही चर्चा केली. यावेळी मुज्जफर हुसैन यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख महेमुद यांनी केले. संचलन परवेज आलम यांनी तर शेवटी आभार जावेद आली यांनी मानले.