प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर :घरात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी, तीन मुले गाढ झोपत असताना गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरामागील दरवाजाचे ग्रील तोडून बेडरुममध्ये प्रवेश करून कपाटातील ४.२३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना आलेगावात घडली. दरम्यान, दोन बंद असलेल्या घरांमध्ये चोरीचा प्रयत्न झाला मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध चान्नी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलेगाव येथील सचिन गजानन मुर्तडकर (वय ३५) रा. वंजारीपुरा, आलेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील गजानन मुर्तडकर, लहान भाऊ नितीन मुर्तडकर हे दोघेही अनुक्रमे आलेगाव व पातुर वनपरिक्षेत्रात वनमजूर म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी २ मे रोजी रात्री कुटुंबाचे जेवण आटोपल्यानंतर आई- वडील व भाऊ हॉलमध्ये झोपले. भावाची पत्नी निकिता, त्यांचा मुलगा अर्णव ,भाचा अथर्व धाईत व भाची सानिका हे दुसऱ्या खोलीत झोपले. तर स्वतः सचिन मुर्तडकर हे बेडरूम रूममध्ये झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरामागील दरवाजाचे ग्रील गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटामध्ये ठेवलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी दहा ग्रॅमप्रमाणे एक लाख वीस हजार रुपये, एक सोन्याची साखळी (गोफ) १५ ग्रॅम किंमत अंदाजे ९० हजार रुपये, एक सोन्याची एक दाणी १२ ग्रॅम अंदाजे किंमत ७२ हजार रुपये, एक सोन्याची पोत १० ग्रॅम अंदाजे ६० हजार रुपये, लहान मुलाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चार ग्रॅम अंदाजे २४ हजार रुपये, कानातील एक जोड ४.५ ग्राम अंदाजे किंमत २७ हजार रुपये, लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या बाळ्या एक जोड एक ग्रॅम अंदाजे किंमत सहा हजार रुपये, एक सोन्याचा ओम १.५ ग्राम अंदाजे किंमत ९ हजार रुपये असे एकूण चार लाख 23 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व व कपाटातील रोख दीड लाख रुपयाची रक्कम लंपास केली आहे.
भावाच्या पत्नीला रात्री तीन वाजता जाग आल्यानंतर चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर शोधाशोध सुरू केली असता गावाला लागून असलेल्या जगन्नाथ खुळे यांच्या शेतात चोरी झालेले सोन्याचे रिकामे बॉक्स अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच बाजूच्या रिकाम्या प्लॉटमध्ये एक कुकर पडलेला दिसून आला. याबाबत रामा भडांगे यांनी सांगितले की, हा कुकर राधाबाई लहानगे यांच्या घरातील आहे. त्यांच्या घरी गेलो असता त्या श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव येथे सेवेसाठी गेलेल्या होत्या. त्यांच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी सामान अस्ताव्यस्त करून चोरी केल्याचे दिसले. तसेच सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले किशोर बबन लहामगे यांच्या घरातही चोरी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट
चोरट्यांचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार विजय चव्हाण इन्वेस्टीगेशन कार, ठसे तज्ञ पथक , श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी परिसराची पाहणी केली. चोरट्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.