एअरक्राफ्ट (विमान) बनविणारे वैज्ञानिक संत स्वामी शुकदास महाराजश्री..

Khozmaster
8 Min Read
 80 व 90 च्या दशकातील पू.महाराजश्रींचा हा अद्भुत अविष्कार अनेकांनी अनुभवला असेलच!
– विवेकानंद विद्या मंदिरातील 80- 90 च्या दशकातील शिकणार्‍या अनेक माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणात अजूनही ह्या आठवणी आहेत!!
    साधारण सत्तरच्या दशकात जन्मलेल्या मुलांना एक गोष्ट आठवत असेल. विवेकानंद जन्मोत्सवामध्ये महाप्रसादाला ते आईवडिलांसोबत हिव-याच्या यात्रेत आल्यानंतर एका अदभूत घटनेचे साक्षीदार ते झालेले आहेत. त्यांना आठवत असेल की, त्यावेळी एक आकाशात भरा-या मारणारं छोटसं विमान आश्रमाव्दारे उडविल्या जात असे. खुप उंच व दुर उडत ते जात असे. त्यावेळी महाप्रसादाच्या पंगतीमध्ये बसलेल्या हजारो भाविकांसाठी ते आकर्षणाचे फार मोठे केंद्र असायचे. परंतु हे विमान बनविले तरी कसे जात होते? ते कसे उडत होते? हाही एक कुतूहलाचा विषय सर्वांसाठी त्यावेळी होता.
    पू. महाराजश्रींमध्ये उपजत प्रचंड ज्ञान होते. सतत चिकित्सक बुध्दिने पू. महाराजश्री संशोधन करीत असतं. फोर्स, प्रेशर, व्हेलॉसिटी, डेन्सिटी, ग्रॅविटेशनल फोर्स यांचे सर्व सिध्दांत पू.महाराजश्रींना जन्मतः अवगत होते. हे सर्व ज्ञान अर्जित करण्यासाठी मोठे शिक्षण घ्यावे लागते. विज्ञान व इंजिनिअरींगचे जे थेरम आहेत आणि प्रिन्सीपल आहेत यांचा आधार घेवून विमान कसे उडत असेल? असा विचार पू. महाराजश्री नेहमी करत असत. विशेष म्हणजे यापुर्वी केंव्हाही पू. महाराजश्री विमानात बसलेले नव्हते.
    हया प्रयोगाची सुरूवात १९८२ साली झाली. १९८२ साली पू. महाराजश्रींनी विवेकानंद विद्या मंदिर व क.म. विद्यालयाची स्थापना केली. वसतिगृहामध्ये मुलांची संख्या वाढली. वसतिगृहातील व विवेकानंद आश्रमातील विद्युत व्यवस्थेची समस्या निवारणासाठी सस्ती येथील श्री. प्रकाश लासुरकर यांची विद्युत तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुट्टीच्या दिवशी लासुरकर अकोल्याला जात असत. एकवेळ पू. महाराजश्रींनी त्यांना ताजना पेठ अकोला येथून एक मिक्सरची मोटर आणायला लावली. त्याचे आर.पी.एम. जास्त असतात. असे महाराजश्रींचे म्हणणे होते. लासुरकर हिव-याला आल्यानंतर एक प्लायवुडचे विमान मॉडेल तयार करण्यात आले. त्याला मिक्सरची मोटार लावली. प्लास्टिकचा पंखा लावला. त्या  मॉडेलचं वजनही हलके होते. त्याला पू.महाराजश्रींनी खोलीत लटकवले. शाळेतील मुलांसाठी तो आकर्षणाचा विषय ठरला. अशाप्रकारे विमान निर्मितीची सुरूवात झाली.
    परंतु पू.महाराजश्रींना पाहिजे तसे समाधान मिळत नव्हते. पू. महाराजश्रींना आकाशात उडणारेच विमान बनविण्याची इच्छा होती. मग बदल सुरू झाले. नंतर पू. महाराजांनी पावर स्प्रे (पाठीवरचा पंप) पंपाचे इंजिन काढले. जून्या मृदगांचे खोड घेतले. त्याला लाकडी छान चाके बसविली. अ‍ॅल्युमिनीयमचे पत्रे कापून त्यापासून पंखे बनविले. हे विमान जमीनीवर पळू लागले. परंतु वजन जास्त असल्यामुळे ते उडत नव्हतेच.
   त्यानंतर पुन्हा पुढचा प्रयोग सुरू झाला. यावेळी अ‍ॅल्युमिनियमची सीट, अ‍ॅल्युमिनियमचेच पंख लावले. पावर स्प्रे (पाठीवरचा पंप)  लावला. आता हे विमान थोडं हलकं असल्यामुळे  ते जमीनीवर वेगात पळू लागलं. नंतर आश्रमाचे स्टेज ते मुख्य इमारत अशी लांबच लांब असारी बांधली. त्याला मधोमध हे विमान लटकविले. हे विमान चालु केलं की आश्रमाच्या मैदानामध्ये गोल गोल फिरत असे. शाळेतील मुलांसाठी प्रत्येक रविवारी हा प्रयोग होत असे. परंतु विमान आकाशामध्ये उडविण्याची महाराजश्रींची जिद्द कायम होती.
    मालेगांव, जि. वाशिमचे स्व. डॉ. विश्वनाथजी माने हे आश्रमाचे विश्वस्त होते. पू. महाराजश्री रूग्णसेवेसाठी मुंबई येथे जात असत. डॉ. माने यांचेही मुंबई येथे जाणे असायचे. मुंबई येथे एक ‘हॉबी सेंटर’ होते. तेथे ‘एरो मॉडलिंगचे विमान’ मिळत असे. त्यामध्ये रिमोट कंट्रोलवर चालणारे व एक हॅन्ड कंट्रोलिंग होणारे असे दोन विमान प्रकार मिळत असतं. त्या विमानाला बॅटरी असायची. त्या बॅटरीला चॉर्ज करून विमान चालविले जात असे. त्यावेळी मुंबई येथील पू. महाराजश्रींचे निस्सीम अनुयायी व विवेकानंद आश्रमाचे माजी विश्वस्त श्री. रविंद्रजी कलंत्रे यांना पू. महाराजश्रींनी डॉ. माने साहेबांसोबत जाण्याचे सांगीतले. डॉ. माने यांना पू. महाराजश्रींनी पाच हजार रूपये दिले. विमान आणण्यात आले. हिवरा आश्रम येथे रोलर नेवून छोटी धाव पट्टी तयार करण्यात आली. प्रकाश लासुरकर यांनी विमानाची सर्व माहिती समजावून घेतली व विमान उडवण्याचा सराव केला. विमान उडविण्याचा दिवस ठरला. पू. महाराजश्री शेतात येवून बसले. विमान सुरू करण्यात आलं. आकाशामध्ये उंच उडतही गेले परंतु काही वेळातच ते खाली पडले व त्याची मोडतोड झाली. सर्व मंडळी निराश झाली.
    दुस-या वेळेस मुंबई येथून संपूर्ण विमान आणण्याऐवजी   ‘एरो मॉडलिंग  किट’ आणण्यात आली. थरमॉकाॅलचे विमान बनविण्यात आले. आठ दिवस इंजीन चालू करण्यात गेले. हाताच्या बोटाने समोरच्या पंख्याला जोरात फिरवून इंजीन चालू केल्या जायचे. आता प्रकाश लासुरकर यांच्या मदतीला अशोकभाऊ थोरहाते, रामदासभाऊ थोरहाते हे दोघे होते. ब-याच प्रयत्नानंतर  इंजीन सुरू झाले. विमान उडविल्या गेले. विमान थोडया उंचावर जाऊन पुन्हा खाली पडले. पू. महाराजश्रींनी एक शक्कल लढविली. रॉकेल २५ %, एरंडेल तेल २५%, इथर ५० % व थोडं ऑइल अस मिश्रण बनवून विमानासाठी इंधन तयार करण्यात आले. परंतु हया इंधनामुळे समोरच्या फॅनमध्ये करंट निर्माण होवून विमानाचा थर्माकॉल जळत असे. अनेक प्रयोग वर्षभर सुरू राहले. पू. महाराजश्री रात्र रात्रभर जागायचे व हे विमान मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असायचे.
    त्यानंतर पू. महाराजश्रींनी कपडा आणायला सांगीतला. तो संपूर्ण कपडा थर्माकॉलला चिटकविण्यात आला. प्लास्टिकची छोटी इंधन टाकी बनविण्यात आली. थर्माकॉलचे विंग बनविण्यात आले. शनिवारचा दिवस होता. पू. महाराजश्री रूग्णसेवेमध्ये होते. दवाखान्यातून पू. महाराजश्री निरोप पाठवायचे व तयारी झाली का विचारायचे. दुपारी ४ वाजता विमान उडविण्याचं ठरलं. पू. महाराजश्री स्वतः शेतामध्ये आले. श्री. अशोकभाऊंवर विमान उडविण्याची जबाबदारी होती. सर्व तयारी पूर्ण झाली. विमानाच्या समोरच्या प्लास्टिकच्या पंख्याला बोटाने जोरात फिरविण्यात आले. विमानाचं छोटसं इंजीन चालू झालं. विमान हातात हवेत धरून अशोकभाऊ थोडसं जोरात धावू लागले. विमानाला वेग आला तसं अशोकभाऊंनी विमानाला हवेत सोडून दिलं. आणि विमान आकाशात उडू लागले. विमान वर उडत गोल गोल घिरटया मारत मारत उंच दूरवर गेले. विमानाच्या छोटया टाकीमध्ये २० मिली एवढे फ्युल (इंधन) बसत असे. ते संपेपर्यंत विमान दूर रायपूरच्या शिवारापर्यंत उडत जाऊन पडले. मग सर्व मंडळी विमानाचा शोध घेण्यासाठी पायीच शिवारं तुडवत निघाली. लोकांना विचारल्या जाऊ लागलं. लोकही सांगायचे ‘आमच्या भागात काहीतरी उडत आलं होतं पण कुठं पडलं आम्हाला माहिती नाही.’ त्यावेळी गावागावात दंवडी देण्यात आली. नंतर कळाले एका व्यक्तीला ते विमान शेताच्या धु-यावर पडलेले सापडले व त्याने ते घरी नेऊन कणगीवर ठेवलेले होते. दवंडी ऐकल्यानंतर त्या व्यक्तीने विमान आश्रमात आणून दिले.
    पू. महाराजश्री आता अतिशय प्रसन्न झाले होते. पू. महाराजश्रींनी विमानाचं वजन थोडं कमी सातशे ते आठशे ग्रॅम ठेवून व्यवस्थित बॅलेन्स करून घेतले. त्यानंतर मालेगांव, अकोला, देऊगांवराजा, चिखली या सर्व ठिकाणी विमान उडविण्याचे प्रयोग झाले. गोरक्षण रोड अकोला येथे तर २५ ते ३० हजार लोक हे उडणारे विमान पाहण्यासाठी आले होते. हे तयार झालेले विमान दरवर्षी महाप्रसादाच्या वेळी उडविल्या जायचे. सर्व उपस्थितांना हे विमान मंत्रमुग्ध करून टाकायचे. लहान लहान मुलं विमान उडतांना पाहून भान हरवून जायचे. १९८९ पर्यंत हा विमान उडविण्याचा प्रयोग सतत सुरू राहिला.
    ज्याकाळामध्ये कोणतेही तंत्रज्ञान विशेष विकसीत नव्हते. अशावेळी पू. महाराजश्रींची जिज्ञासा, जिद्द व कर्तव्यातील तळमळ यामुळे एक अदभूत अविष्कार ह्या वैज्ञानिक संताने साकार केला होता.
– आत्मानंद थोरहाते
   विवेकानंद आश्रम.
अज्ञात_स्वामी_शुकदास
0 9 3 7 5 8
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *