नवी दिल्ली,
ऑनलाईन अनुवादाच्या जगात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या Google Translate सेवेला २० वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने Google India ने एक रोचक माहिती समोर आणली आहे. गेल्या दोन दशकांत जगात सर्वाधिक वेळा अनुवाद करण्यात आलेला शब्द म्हणजे ‘Thank You’ अर्थात ‘धन्यवाद’ असल्याचा दावा गुगलने केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये गुगलने विविध भाषांमधील ‘Thank You’ शब्दाचे व्हिज्युअल सादर केले. हा साधा वाटणारा शब्द प्रत्यक्षात जगभरातील संस्कृती, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
छोटा शब्द, मोठी भावना
‘Thank You’ हे फक्त दोन शब्दांचे साधे वाक्य असले तरी त्यामागील भावना अत्यंत व्यापक आहे. लोक एकमेकांप्रती आदर, सन्मान, आभार आणि सकारात्मक व्यवहार व्यक्त करण्यासाठी या शब्दाचा वापर करतात. त्यामुळेच हा शब्द जगभरात सर्वाधिक वापरला जातो आणि त्याचाच सर्वाधिक अनुवाद झाल्याचे समोर आले आहे.
गुगलच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून अनेकांनी आपल्या मातृभाषेतील ‘धन्यवाद’ शब्द कमेंटद्वारे शेअर केला आहे.
२० वर्षांचा प्रवास
Google Translate ची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. सुरुवातीला ही सेवा मर्यादित भाषांपुरती उपलब्ध होती. मात्र कालांतराने या प्लॅटफॉर्मने जगभरातील शेकडो भाषांचा समावेश केला आणि तो जगातील सर्वाधिक लोकप्रिय अनुवाद साधन बनला.
आज ही सेवा वेबसाईटसह Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून कोट्यवधी लोक दैनंदिन वापरासाठी याचा आधार घेतात.
AI मुळे अनुवाद अधिक स्मार्ट
सुरुवातीच्या काळात Google Translate हे ‘स्टॅटिस्टिकल मशीन ट्रान्सलेशन’ तंत्रज्ञानावर आधारित होते. यात पूर्वनिश्चित शब्दसंग्रहाच्या आधारे अनुवाद केला जात होता. मात्र आता गुगलने AI आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याने अनुवाद अधिक जलद, अचूक आणि नैसर्गिक झाला आहे.
भारतीय भाषांनाही मोठे स्थान
गेल्या काही वर्षांत Google ने हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली, तमिळ, तेलुगू, उर्दू यांसह अनेक भारतीय भाषा आणि बोलीभाषांचा समावेश केला आहे. त्यामुळे भारतासारख्या बहुभाषिक देशात माहितीचे आदान-प्रदान अधिक सुलभ झाले आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाला जोडणाऱ्या Google Translate च्या या प्रवासात ‘Thank You’ हा शब्द जागतिक संवाद आणि सौहार्दाचे प्रतीक ठरल्याचे चित्र समोर आले आहे.
Users Today : 16