नाशिक : नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या कंपनीच्या कार्यालयातील तब्बल पाच कोटींचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजली जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरात ही धाडसी चोरी झाल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीनंतर आता नाशिक शहरातील गुन्हेगारी पुन्हा वाढली असून शहर पोलिसांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नाशिक मधील डोंगरे वस्तीगृह मैदान परिसरात आयसीआयसीआय होम फायनान्स या संस्थेचे कार्यालय असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची आणि लोकांची वर्दळ असते. आयसीआयसीआय होम फायनान्स संस्थेचे कार्यालय तिसऱ्या मजल्यावर असून कोणालाही न समजता अतिशय चतुराईने चोरट्याने हे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
चोरट्याने तब्बल 222 खातेधारकांचे पाच कोटींची दागिने लंपास केल्याची माहिती समोर येत आहे. लॉकर्स फोडून तब्बल पाच कोटींच्या दागिन्यांची चोरी झालीय. मिळालेल्या माहितीनुसार लॉकर्सच्या चाव्या मध्ये ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे पोलिसांना वेगळाच संशय येत आहे. विशेष म्हणजे चोरटे पीपीई किट घालून आले होते. सीसीटीव्हीची नजर असताना आणि पहारेकरांचा पहारा असतानाही चोरट्यांनी चोरीचे धाडस केले, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दरोडेखोरांचे चेहरे दिसत असून सरकार वाडा पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास सुरू केला आहे.पुढच्या दरवाजावर सुरक्षारक्षक होते. मात्र चोर मागच्या खिडकीतून पळून गेल्याचे समोर येत आहे. सरकार वाडा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेचा छडा कधी लागणार? याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
त्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद वारंवार होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात शहर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समन्स देखील बजावण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिक शहरातील या चोरीमुळे नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे आता या चोरीतील मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी नाशिक शहर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.
Users Today : 11