छत्रपती संभाजीनगर: ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवून उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मारोती नाथा ढाकणे (४२) असे या संशयित आरोपीचे नाव असून तो लष्करात हवालदार पदावर कार्यरत असल्याचे समोर येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देखील आरोपीने आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला असता दानवे यांनी याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार केली. यानंतर ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारोती ढाकणे याने ईव्हीएम हॅक करून देतो. त्यासाठी अडीच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी विरोधी पक्षनेते दानवे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून केली. याबाबत दानवे यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवत तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीय लक्षात घेत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमत कारवाईचे निर्देश दिले. विरोदी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाऊ राजेंद्र दानवे हे पथकासह रवाना झाले.
मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मारोती ढाकणे याने राजेंद्र दानवे यांना मध्यवर्ती बस स्थानक समोरील हॉटेल न्यू मॉडर्न टी हाऊस स्विट अॅण्ड स्नॅक्स येथे बोलविले. राजेंद्र दानवे यांच्यासह साध्या गणवेषातील पोलीस पथक आणि पंच आदींनी सापळा लावला. हॉटेलमध्ये मारोती आला. त्याने राजेंद्र दानवे यांना सांगितले कि, माझ्याकडे एक विशिष्ट प्रकारची चीप असून १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी विशिष्ट प्रकारची चिप मतदान केंद्रामध्ये जाऊन ईव्हीएम मशीनला बसविण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे फक्त तुमच्याच उमेदवारास जास्तीत जास्त मतदान मिळेल, अशी थाप मारली.तसेच मोबाईलवर संभाषणात ठरल्याप्रमाणे अडीच कोटी रूपयांपैकी तडजोडीअंती दीड कोटी रुपयांची मागणी करत टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर दानवे यांच्याकडून एक लाखाची रक्कम स्विकारतानाच दबा धरुन बसलेल्या पथकाने मारोती ढाकणे याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Users Today : 54