हिंगोली : हिंगोलीत तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या केवळ आठ दिवसांनंतर तरुण अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सुकळी येथे पत्नीला आणण्यासाठी आपल्या मोटरसायकल वरून गेलेला नवविवाहित तरूण दोन दिवसापासून अचानक बेपत्ता झाला आहे. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी २८ एप्रिल रोजी रविवारी रात्रभर सिंदगी आणि आदी शिवारात तसंच जंगलात तरुणाचा शोध घेतला, मात्र अद्यापही युवकाचा शोध लागला नाही. प्रमोद नागोराव मात्रे, वय वर्ष २३ असं या नवविवाहित तरुणाचे नाव आहे. नवविवाहित तरुण लग्नानंतर मांडव परतनी आणि पत्नीला आणण्यासाठी गेला असल्याची माहिती आहे.
नवविवाहित तरुण बेपत्ता झाला असल्याची माहिती गावात समजली. आपला मुलगा प्रमोद बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याचे वडील नागोराव मात्रे यांनी कुरुंदा पोलीस स्टेशन गाठून आपला मुलगा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी प्रमोद बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार घेतली.
कुरुंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे आणि यांच्या पथकाने देखील शोध सुरू केला. तपासादरम्यान सुकळी कोठारी या परिसरात नवविवाहित युवकाची मोटरसायकल चावीसह आढळून आली. रविवारी दुपारपासूनच बेपत्ता झालेला प्रमोद याचा शोध सुरू केला असताना दुचाकी ज्या भागात सापडली, त्या भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला. या भागातील सर्व परिसर पिंजून काढला आहे. रविवारी रात्रीनंतर सोमवारी २९ एप्रिल रोजी सकाळपासून या भागात शोध सुरू करण्यात आला. मात्र अद्यापही बेपत्ता तरुण आढळत नसल्याने कुटुंबिय चिंतातूर झाला आहे.