नागपूर : हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षयतृतीयेचा मानला जातो. अक्षय्यतृतीयेला केलेल्या पुण्यकर्माचे फळ क्षय न होणारे म्हणजे अक्षय्य असते. विवाह, उपनयन, गृहप्रवेश, वस्त्र-आभूषणे, वाहन खरेदीसाठी अक्षय्यतृतीया शुभ मानतातमहाभारत काळात पांडव जेव्हा वनवासात होते, तेव्हा योगेश्वर कृष्णाने पांडवांना अक्षयपात्र सप्रेम भेट दिले होते. या अक्षयपात्रामुळेच पांडवांना भोजनाची चिंता वाटली नाही. श्रीकृष्ण सुदामा यांच्या मित्रप्रेमाच्या कथेलादेखील अक्षय्यतृतीयेचा संदर्भ आहे. याच दिवशी मूठभर पोह्याच्या बदल्यात कृष्णाने सुदामाला ऐश्वर्य दिले. हिंदू संस्कृतीत या दिवशी पितरांना वाळा घातलेला गार उदककुंभ आणि आंबा हे मधुरफळ अर्पण करून तृप्त केले जाते. याच दिवशी भगवान श्री विष्णुचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्मदिवस असतो.
श्री गजानन महाराज असेच एकदा भक्तगणात बसले होते. त्या मंडळीत चंदू मुकुंद हा भक्त होता. त्याला महाराज म्हणाले, ‘हे आंबे नकोत मला। दोन कान्होले उतरंडीला। आहेत तुझ्या ते आण जा’।। (०४-८०) मुकुंदकडे अक्षय्यतृतीयेला केलेले कान्हवले त्याच दिवशी संपले होते. तरीही संतवाणी आहे म्हणून घरी जाऊन त्याने बायकोला विचारले. तीही नाही म्हणाली. ‘चांगली आठवण करून पहा’ असे चंदू म्हणताच, ती घोटाळली. विचार करू लागली. तेव्हा अचानक तिला कान्हवले ठेवल्याची आठवण झाली. खापराच्या कळशीमध्ये ठेवलेले दोन कान्हवले तिने चंदूला दिले. कान्हवले घेऊन चंदू महाराजांकडे आला आणि त्यांना अर्पण केले. त्यांनी अर्धे कान्हवले प्रसाद म्हणून चंदूला दिले. महाराज त्रिकालज्ञ आहेत, याची सर्वांना ओळख पटली.
अक्षय्यतृतीया मे महिन्याच्या सुरुवातीला येणारा सण आहे. या काळात एकीकडे रखरखीत ऊन, तर दुसरीकडे शिशिरात गळून गेलेल्या पानांऐवजी झाडांना नवी पालवी फुटू लागते. मधुर अशा आंब्याच्या आणि शेवग्याच्या झाडांना मोहर लगडतो. या काळात मोगरा, चाफा यासारख्या फुलांना बहर येऊन त्यांचा परिमल आसमंतात दरवळतो. एकीकडे क्षय होतो आहे असे वाटत असतानाच, पुन्हा उसळून नवनिर्मिती होते. संहार आणि सर्जन, क्षय आणि अक्षय यांच्या संधीकाळाचा हा उत्सव नाण्याच्या दोन बाजूंसारखा आहे. अशावेळी बुद्धिवादी माणसाने निसर्गाचा समतोल सांधण्यासाठी कार्यरत झाले पाहिजे.
Users Today : 22