बालविवाहांवर ‘वॉच’, नाशिक जिल्ह्यात गावपातळीवर बाल संरक्षण समितीची स्थापना

Khozmaster
2 Min Read

 नाशिक : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्हा बालविवाहाच्या घटनांत अकराव्या क्रमांकावर असल्याचे समोर आले होते. बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर बालविवाह निर्मूलन जिल्हा कृतिदल स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून, बालविवाहमुक्त नाशिक जिल्हा करण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत आहे. महिला आणि बालविकास विभाग, चाइल्डलाइनसह आता संरक्षण समितीही बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

बालविवाहासह बालकांवरील अत्याचार आणि अनिष्ट प्रथा नष्ट व्हाव्यात यासाठी ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. गावचे सरपंच हे या संरक्षण समितीचे अध्यक्ष असून, अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत. आशा सेविका, पोलिस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, महिला बचत गट प्रतिनिधी, बालमित्र (१२ ते १८ वर्षे वयोगटातील एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) यांचा समावेश आहे. ग्राम बालसंरक्षण समितीच्या दरमहा नियमित बैठका होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बालविवाह निर्मूलन करण्याच्या दृष्टीने समितीकडून क्वचित कार्यवाही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी समित्यांना बालविवाह निर्मूलनासाठी नियमित बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

ज्या ठिकाणी बालविवाह होण्याची शक्यता आहे, अशा कुटुंबांना ग्रामपंचायतीत बोलावून किंवा त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे समुपदेश करावे. समुपदेशनानंतरही समितीचे म्हणणे ऐकून न घेतल्यास ग्राम बालसंरक्षण समितीच्या अध्यक्षांनी, समितीच्या सदस्यांनी किंवा इतर नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये किंवा चाइल्डलाइन हेल्पलाइन क्रमांक १०९८ किंवा ११२ या क्रमांकावर माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

१८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी व २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणाचा विवाह केल्यास दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. बालविवाह झाल्यास संबंधित वधु-वरांचे आई-वडील किंवा पालक, अन्य नातेवाइक मित्र परिवार, मंदिराचे विश्वस्त, फोटोग्राफर, प्रिंटिंग प्रेस, वाजंत्री, सभागृह व्यवस्थापक, केटरिंग आणि जे अशा विवाहात सहभागी झाले आहेत, अशा सर्वांना दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. सोबतच ग्रामसेवकांनी जन्मदाखल्याची खोटी नोंद केल्यास त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात यावी, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *