पहिलवान भूषण लहामगे हत्या प्रकरण: वैभवची ‘एमडी’ लिंक, ललित पानपाटील प्रकरणापर्यंत धागेदोरे

Khozmaster
3 Min Read

नाशिक : उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगे याच्या हत्येप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांच्या अटकेत असलेला संशयित वैभव लहामगे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली. ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याच्या पलायन प्रकरणात वैभवचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे कळते. ललितच्या मागावर असताना नाशिक गुन्हे शाखेने वैभवची चौकशी करून ललितची माहिती संकलित केली होती. तर सध्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वैभवनेच जुना गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय फायनान्स बँकेतून पाच कोटींचे दागिने चोरल्याचे उघड झाले आहे.

४ मे रोजी जुना गंगापूर नाक्यावरील आयसीआयसीआय फायनान्स बँकेच्या लॉकरमधून पाच कोटी रुपयांच्या १३ किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणात बँकेतील हाउसकिपर तुकाराम गोवर्धने (३५, रा. उत्तमनगर) याला पोलिसांनी अटक केली. त्याने संशयित वैभव याला बँकेची संपूर्ण माहिती, लॉकरच्या किल्लीची जागा सांगून संशयित सतीश चौधरी व रतन जाधव (दोघे रा. सिडको) यांच्या मदतीने घरफोडी केली. दरम्यान, १० मे रोजी नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे पहिलवान भूषण लहामगे याची कोयत्याने वार करून हत्या झाली. त्याचा चुलत भाऊ वैभव याला पोलिसांनी अटक केली. तर वैभवला हत्याप्रकरणात सतीश व रतन यांनी मदत केल्याचा संशय आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण पोलिस दोघांच्या मागावर आहेत.

ललितच्या गाडीची माहिती

ऑक्टोबर २०२३ मध्ये ड्रग्ज माफिया ललित, भूषण पानपाटील यांच्यासह सनी पगारे, अर्जून पिवाल टोळीच्या ‘एमडी’ कारखाने व गोदामांवर राज्यभरात धाडसत्र राबविण्यात आले. नाशिक शहर पोलिसांनी सोलापुरात ‘एमडी’ कारखाने व गोदाम उद्ध्वस्त केले. दरम्यान, ललित हा पुण्यातून नाशिकमार्गे पळाल्यानंतर पोलिस मागावर होते. त्यावेळी वैभव लहामगे याची गुन्हे शाखेने चौकशी केली होती. वैभवने ललितच्या गाडीसंदर्भात पोलिसांना माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, वैभवचा थेट हात गुन्ह्यात नसल्याने त्याला समज देत सोडले होते.

दरोडा, घरफोडी, खून…

वैभव याने चुलत भाऊ भूषण याची हत्या जमिनीसह आर्थिक वादातून केल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, वैभवने २०१५ मध्ये ठाणे येथील चेकमेट कंपनीत दरोडा टाकून एक कोटी ४० लाख रुपये जव्हारमध्ये लपविले होते. याप्रकरणात अकरा जणांना नाशिक व ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यावेळी संशयित उमेश वाघ (रा. चुंचाळे, नाशिक. सध्या रा. यशवंतनगर, विरार) यालाही अटक केली होती. दरम्यान, उमेश याने ‘एमडी’ प्रकरणातील सनी पगारे याच्या टोळीला सोलापुरात कारखाने सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे दरोडा, घरफोडी, खूनासह इतरही गंभीर गुन्ह्यात वैभवचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात पुढे येत आहे.

0 8 9 4 8 1
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *