दोडामार्ग, बांदा परिसराला वादळी पावसाचा तडाखा; सिंधुदुर्गमध्ये झाडे पडल्याने रस्ते बंद

Khozmaster
2 Min Read

दोडामार्ग : विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाट करीत वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी तालुक्यात हाहाकार माजविला. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. मणेरी तळेवाडी येथे घरांचे पत्रे उडाले.

विद्युत खांब जमीनदोस्त झाले. वाहने व घरांवर झाडे पडली. एकंदरीत संपूर्ण तळेवाडीतील ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले.

दरम्यान, दोडामार्गप्रमाणेच बांदा दशक्रोशीलाही वादळी पावसाने तडाखा दिला. सावंतवाडी शहरातही पावसाने काही ठिकाणी पाणी साचले होते. सिंधुदुर्गनगरीत वादळी पावसाने अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

दोडामार्ग तालुक्यात मागील दहा दिवसांपासून वळिवाचा पाऊस हजेरी लावत आहे. सुरुवातीला दिवसाआड लागणारा पाऊस आता दररोज कोसळत आहे. बुधवारी सकाळी वातावरण नेहमीप्रमाणेच होते. मात्र, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक ढग जमा होऊ लागले. हळूहळू विजांचा लखलखाट सुरू झाला. यावेळी मेघगर्जनाही होऊ लागली. सोसाट्याचा वारा वाहू लागला अन् सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.

शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. विद्युत पुरवठा खंडित झाला. वाऱ्यासहित आलेल्या पावसामुळे दोडामार्ग-विजघर राज्य मार्गावर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. याचा विपरित परिणाम वाहतुकीवर झाला. या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू होती.

मणेरी तळेवाडी उद्ध्वस्त

मणेरी तळेवाडी येथे पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तळेवाडी ते आंबेली या मुख्य रस्त्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. अनेक ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी घरात तुंबले. विद्युत खांब जमीनदोस्त झाले. वाहनांवरही झाडे, पत्रे पडल्याने काचा फुटल्या. एकंदरीत या पावसामुळे तळेवाडीतील सर्वच ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *