कऱ्हाड : भाऊ आणि आईचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. दिलीप पतंगे यांनी बुधवारी ही शिक्षा ठोठावली.
राकेश गजानन घोडके (वय ५०, रा. श्रीराम निवास, आझाद कॉलनी, आगाशिवनगर, कऱ्हाड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. राजेश गजानन घोडके (वय ४०), जयश्री गजानन घोडके (वय ६३) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. सरकार पक्षाचे वकील ॲड. आर. डी. परमाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगाशिवनगर येथील आझाद कॉलनीतील श्रीराम निवास येथे घोडके कुटुंब वास्तव्यास होते. त्यांच्या घराचा वरचा मजला तसेच खालच्या मजल्यावरील वाटणीवरून राकेश याचा भाऊ राजेश व आई जयश्री यांच्याशी वाद होता.
९ एप्रिल २०१८ रोजी राकेश आणि राजेश यांच्यात सकाळी पुन्हा वाद झाला. त्यावेळी राकेश याने आई जयश्री व भाऊ राजेश यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करीत डोक्यात पाईप घातला. त्यानंतर धारदार शस्त्राने भावासह व आईचा खून केला. या प्रकरणी अलंकार श्यामराव जोशी यांनी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. एच. राजमाने यांनी केला. खटल्याची सुनावणी न्या. दिलीप पतंगे यांच्यासमोर झाली. सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. त्यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. न्यायालयाने या गुन्ह्यात आरोपी राकेश घोडके याला दोषी धरून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला पैरवी अधिकारी एस. व्ही. पाटील, हवालदार एस. व्ही. खिलारे, एस. बी. भोसले, ए. आर. पाटील यांनी सहकार्य केले.