बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्या एक कोटीच्या लाच प्रकरणात एसआयटी प्रमुख असलेल्या अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी जबाब घेतला आहे.
तर मुख्य तपास अधिकारी असलेले बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे अजूनही तपासाच्या नावाखाली बाहेरच आहेत. खाडे पाेलिस काेठडीत आहे, तोपर्यंत खाडे बीडला येण्याची शक्यता कमी आहे. खाडे न्यायालयीन कोठडीत गेल्यावरच गोल्डे एसीबीला जबाब देतील, असे सूत्रांकडून समजते.
जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. यात खाडेसह सहायक फौजदार आर. बी. जाधवर, खासगी व्यक्ती कुशल जैनविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. एसीबीने खाडेच्या घराची झडती घेतली असता रोख एक कोटी रुपये, एक किलो सोने आणि पाच किलो चांदी असे घबाड सापडले होते. यात कोणाचा किती वाटा? याचा शोध एसीबी घेत आहे. त्यामुळेच जिजाऊच्या प्रकरणातील एसआयटीचे तपास अधिकारी बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे, पर्यवेक्षण अधिकारी अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचे जबाब घेतले जाणार आहेत. पांडकर यांचा बुधवारी जबाब घेण्यात आला आहे, परंतु गोल्डे हे तपासाच्या नावाखाली बाहेर असल्याचे सांगून पळवाटा काढत आहेत. १ जूनपर्यंत खाडे हा पोलिस कोठडीत आहे. त्याच्यासमोर चौकशी झाल्यावर आपला भांडाफोड होईल, अशी भीती काही अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळेच ते पळवाटा शोधत आहेत. असाच काहीसा प्रकार हा तपास अधिकाऱ्यांच्या बाबतीत असल्याचे सांगण्यात येत आहे. आता ते कधी हजर होतात आणि एसीबीला काय जबाब देतात? याकडे लक्ष लागले आहे.
एसपींनी वेळ मागितला
एसीबीने २५ मे रोजी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना पत्र देऊन तपासकामी उपअधीक्षक गोल्डे यांना कागदपत्रे घेऊन हजर राहण्याबाबत कळविले होते. त्यानंतर २७ मे रोजी दुसरे पत्र देऊन गोल्डे यांना चौकशीला पाठवा, असे सांगितले. परंतु ठाकूर यांनी गोल्डे हे तपासकामी बाहेर असल्याचे सांगत वेळ वाढवून मागितला आहे. विशेष म्हणजे या पत्रात कोणतीही तारीख न देता मोघम वेळ मागितली आहे. आपल्या अधिकाऱ्यांना एक कोटीच्या लाच प्रकरणातून वाचविण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गोल्डे यांनी वेळ वाढवून मागितला
एसआयटी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून अपर अधीक्षक सचिन पांडकर यांचा जबाब घेतला आहे. उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे यांनाही तपासकामी हजर राहण्याबाबत पोलिस अधीक्षकांना पत्र दिले होते. परंतु त्यांनी गोल्डे हे तपासकामी बाहेर असल्याचे सांगितले असून वेळ वाढवून मागितला आहे. यात तारखेचा उल्लेख नाही.
– शंकर शिंदे, उपअधीक्षक, एसीबी बीड