अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय स्थित 11 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अकोला चे सी.ए टी.सी. 104 या कॅम्पचे आयोजन दि. 15 जून 2024 ते 24 जून 24 पर्यंत करण्यात आले आहे. या कॅम्पला भेट देण्यासाठी अमरावती एन.सी.सी. ग्रुपचे ब्रिगेडियर शंतनु पी. मैंनकर हे आज दि. 20 जून 2024 रोजी शिबिर स्थळाला भेट देण्यासाठी आले होते. 11 महाराष्ट्र बटालियन अकोला येथे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी.पी. भदोला यांनी प्रथम ब्रिगेडियर सरांचे स्वागत केले. नंतर ब्रिगेडियर सरांनी शिबिराला उपस्थित असलेल्या कॅडेट्सना संबोधित केले. संबोधन करते वेळी ब्रिगेडियर सरांनी कॅडेट्सना आपल्या देशाची अखंडता व सांस्कृतिकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. आपली संस्कृती, भाषा, बोली, संस्कारी विचारधारा चे जतन करावे व विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी व्हावे तसेच मुलींनी निर्भय बनावे याबद्दल त्यांनी कॅडेट्सला सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्याकडे जर चांगले विचार आणि संस्कार असतील तर आपण प्रभू श्रीरामासारखे आदर्श पुरुष होता येईल असे उद्गार त्यांनी यावेळेस काढले.
कॅडेट्सला संबोधित केल्यानंतर ब्रिगेडियर सरांनी शिबिर स्थळावरील भोजन कक्ष, निवास कक्ष, प्रशिक्षण स्थळ, मैदान तसेच भांडारगृह व्यवस्थेची पाहणी केली. कॅडेट सोबत भोजनचा आस्वाद घेऊन ब्रिगेडियर सर अमरावतीकडे रवाना झाले. सी.ए.टी.सी. 104 हा कॅम्प 11 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अकोलाचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला यांचे नेतृत्वात चालू आहे. या कॅम्प मध्ये लेफ्टनंट डॉ. दारासिंग राठोड, लेफ्टनंट डॉ. सुनील बोरचाटे, सेकंड ऑफिसर श्रीमती रीता सोळंके, थर्ड ऑफिसर श्री. पंकज गिरी, सुभेदार मेजर अशोककुमार तसेच पी.आय. स्टॉप, विविध विद्यालय आणि महाविद्यालयाचे 422 कॅडेट्स सहभागी झाले आहेत.