अकोला : गत अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून अकोला जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरु राहिल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले.
अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांमध्ये ९० मिलिमिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
रविवारी सायंकाळी सुरु झालेल्या पावसाची रिपरिप मध्यरात्रीपर्यंत सुरुच होती. सोमवारी पहाटे पुन्हा पावसाने जाेर पकडला. उजाडल्यानंतर पावसाचा वेग वाढला. परिणामी शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मोठी उमरी, जवाहर नगर, डाबकी रोड, कौलखेड, शिवणी, शिवर, गीता नगर, गंगा नगर, एमरॉल्ड कॉलनी, जुने शहरातील विविध भागांमध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही भागात नागरिकांमध्ये रस्त्यावरील पाणी शिरले. मोर्णा नदीलाही मोठा पूर आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय परिसरातही पाणी साचल्याने रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागला.
अतिवृष्टी नोंद झालेले तालुके
बाळापुर- ९०.०८ मिमी, अकोला- ९० मिमी
अतिवृष्टी झालेले महसुल मंडळ (आकडे मिलीमिटरमध्ये)
चोहोट्टा बाजार – १०६, बाळापुर- ११६.८ , पारस- १११.५ ,व्याळा-६६.८ ,वाडेगांव – ६६.८ ,उरळ – १००.८, हातरुण-७९.८ , अकोला- ११०.०, दहीहांडा- ८५.० ,कापशी- १००.३ ,उगवा- ६९.५, आगर- ६९.८ ,शिवण- १६३.०, कौलखेड-१४६.०, राजंदा – ११६.५