बीड : मराठा आरक्षण जनजागृतीसह शांतता रॅली आज बीड शहरातून काढली जाणार आहे. या रॅलीत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून समाजाशी संवाद साधणार आहेत.
ते काय बोलणार आणि त्यांच्या निशाण्यावर कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; तर दुसऱ्या बाजूला संभाव्य गर्दी पाहता पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. तसेच पाच हजार स्वयंसेवकही मदतीला आहेत. दरम्यान, आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव, महिला, तरूणी या बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. गर्दीने बीड शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ब्लॉक झाले आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा समाज बांधव रॅलीत सहभागी होत आहेत. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होऊन माळीवेस, सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, जालना रोडमार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे. या रॅलीची संयोजकांकडून पूर्ण तयारी झाली आहे.
कोणत्या तालुक्याला कोठे वाहन पार्किंग?
गेवराई – सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसर व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल परिसर
माजलगाव – रिलायन्स पेट्रोल पंपासमोर व मिनी बायपास परिसर
परळी – शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे व बिंदुसरा रेस्ट हाऊस परिसर
माजलगाव – माने कॉम्प्लेक्स परिसर
धारूर – निळकंठेश्वर मंदिर परिसर
वडवणी – कनकालेश्वर मंदिर परिसर
अंबाजोगाई – बिंदुसरा नदीपात्र परिसर
केज – खंडेश्वरी मंदिर व एमआयडीसी परिसर
बीड – फटाका मैदान व मोंढा रोड परिसर
आष्टी – शासकीय आयटीआय परिसर
पाटोदा – जुने व नवी पंचायत समिती परिसर
शिरूर – यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर
८० भोंगे
२ लायनरी साऊंड
३५०० पुरुष स्वयंसेवक
१५०० महिला स्वयंसेवक
८०० टी-शर्ट घालून स्वयंसेवक
१२ रुग्णवाहिका
४ कार्डियाक रुग्णवाहिका
१८ डॉक्टर
जरांगेभोवती १०० तरुणांची साखळी
शांतता रॅलीत समोरच्या बाजूला कुसळंब येथील ढोलपथक असणार आहे. रॅलीत जरांगे-पाटील हे सहभागी असतील. त्यांच्या बाजूने ऑरेंज टी-शर्ट घातलेल्या १०० तरुणांची सुरक्षा साखळी असेल. तसेच ऑरेंज टी-शर्टमधील २०० संवादक सभेच्या ठिकाणी राहणार आहेत. काळा टी-शर्ट घातलेले २०० तरुण रॅलीला रस्ता करून देतील, २०० पार्किंगच्या ठिकाणी राहतील. ५० तरुणी या महिलांमध्ये असतील. १० वैद्यकीय, १० माजी सैनिक आणि ३० जण ज्येष्ठ नागरिकांना मदत करणार आहेत.
टेम्पोवर असेल १२ फूट उंच स्टेज
छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे-पाटील यांच्यासाठी एका टेम्पोवर १२ फूट उंच असे स्टेज तयार केले आहे. त्यावर साधारण ५० माणसांची क्षमता आहे; परंतु यावर केवळ जरांगे-पाटील हे एकमेव राहणार असून, बाजूने सुरक्षा करणारे तरुण असतील.
रॅली मार्गावर झेंडे
ज्या मार्गाने ही शांतता रॅली जाणार आहे, त्या मार्गांवर सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. सुभाष रोडवर मोठ्या झेंड्यांच्या कमानी करण्यात आल्या आहेत. तसेच जरांगे-पाटील यांच्या स्वागताचे बॅनरही मोठ्या प्रमाणात लागले आहेत.