साताऱ्यातील संग्रहालयात महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा, इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र

Khozmaster
2 Min Read

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक वाघनखांबराेबरच स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली आहे. गोलाकार व एक इंच व्यासाची ही नाममुद्रा चांदीची असून, ती फारसी भाषेत आहे.

वाघनखांबरोबरच ही नाममुद्रादेखील इतिहासप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

वाघनखांबरोबर शस्त्र प्रदर्शनात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची नाममुद्रादेखील प्रथमच पाहण्यासाठी मांडण्यात आली आहे. नाममुद्रा साधारणपणे १९७६ रोजी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, मुंबई येथून साताऱ्यातील वस्तुसंग्रहालयात सामील झाल्याची नोंद आहे.

अशी आहे नाममुद्रा..

  • प्राचीन काळापासून शिक्क्यांचा वापर होत आला आहे. शिक्का म्हणजे ‘नाममुद्रा’ आणि मोर्तब म्हणजे ‘समाप्तीमुद्रा’.
  • महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा गोलाकार असून तिचा व्यास एक इंच आहे.
  • छत्रपतींच्या नाममुद्रा देवगिरी व संस्कृत लिपीत आढळतात. मात्र, येसूबाई यांची नाममुद्रा फारसी भाषेत आहे.
  • या मुद्रेवर तीन ओळीचा लेख आहे. ‘राजा सनह अहद वलिदा राजा शाहू यांच्या मातोश्री येसूबाई’ असा त्याचा अर्थ आहे.
  • यातील ‘सनह अहद’ या शब्दाचा अर्थ पहिले वर्ष असा आहे. फारसी भाषेत प्रथम वर्षाला अहद असे म्हणतात.
  • या नाममुद्रेबरोबर ‘मोर्तब सूद’ अशी लहान आकाराची आणखी एक मुद्रा असून पत्राच्या शेवटी याचा वापर केला जात असावा.
  • मुद्रांवरील अक्षरे उलट कोरलेली असायची जेणेकरून शिक्का कागदावर उमटवताना तो सरळ उमटेल.
  • महाराणी येसूबाई यांची मुद्रा उमटलेले कुठलेही पत्र अजून उपलब्ध झालेले नाही.

स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वगाथेला तोड नाही. त्यांची नाममुद्रा प्रथमच संग्रहालयात पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. फासरी भाषेतील ही नाममुद्रा इतिहासप्रेमींचे आकर्षण ठरली आहे. – प्रवीण शिंदे, संग्रहालय अभिरक्षक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *