बीड: मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावरील पर्यायी पूल आज सकाळी झालेल्या जोरदार पावसाने कडी नदीला पूर आल्याने पुन्हा एकदा वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, हा पर्यायी पूल ९ जुलै रोजी देखील जोरदार पावसाने वाहून गेला होता. सव्वा महिन्यात एकच पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागले.
बीड-नगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कडा येथे मुख्य पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी नळकांडी पुल तयार करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी झालेल्या पावसाने भरावासह पूल वाहून गेला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुन्हा मातीचा भराव टाकून पूल उभा करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी ( दि. १७) रात्री झालेल्या पावसामुळे कडी नदीची पाणी पातळी वाढत गेली आणि आज शनिवारी सकाळीच हा पर्यायी पूल पुन्हा एकदा वाहून गेला. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नव्याने बांधकाम सुरू असलेल्या पुलावरून एका बाजून वाहतूक सुरू करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुख्य पूल खुला केला
पर्यायी पुल वाहून गेला असून आता मुख्य पुल रहदारीसाठी खुला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. -राजेंद्र भोपळे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग