सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात

Khozmaster
2 Min Read

अक्कलकोट : यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. प्रारंभी पेरणी लागवड केलेल्या कांद्याची विविध अडचणींवर मात करीत येत्या दोन आठवड्यांत काढणीला सुरुवात होणार आहे.

 

सध्या कांद्याला चांगले दर असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर अचानकपणे कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यामुळे यावर्षी याकडे शेतकरी पाठ दाखवतील असे वाटत असताना पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत.

कृषी विभागाचे अक्कलकोट, वागदरी, तडवळ, मैदर्गी असे चार मंडळ आहेत. त्यापैकी तडवळ भागात सर्वाधिक कांदा लागवड झाले आहे.

तसेच किणी, चपळगाव, शिरवळ, वागदरी, सलगर, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, तडवळ, तोळणूर, नागणसूर, तडवळ, करजगी, आशा मोठमोठ्या गावांतील शिवारात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

कांद्यावर यंदा करपासारखे रोग आले होते. चांगल्या प्रकारे औषध फवारणी करून रोगावर नियंत्रण मिळविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे.

किरकोळ बाजारात ५० रुपये दर
कांद्याला किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दर आहे. तर प्रतिक्विंटल २५०० ते ४२०० रुपये आहे. एकट्या तडवळ भागात सर्वाधिक तब्बल १५०० हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा चांगला दर मिळाल्यास कांदा उत्पादक शेतकरी मालामाल होण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यात मागील वर्षी ४०६९ हेक्टर, तर यंदा ४००० हजार हेक्टरवर खरीप कांदा लागवड करण्यात आली आहे. मागच्या वर्षी दर मिळाले नसल्याने शेतकरी अडचणी आले होते. यंदा चांगला दर मिळण्याची आशा आहे. मध्यंतरी कांदा पिकावर करपासारखे रोग काही भागांत झपाट्याने वाढत असताना औषध फवारणी करून शेतकऱ्यांनी कंट्रोल केले आहे. सध्या प्रतिक्विंटल चांगले दर असून, असेच दर राहिल्यास शेतकऱ्यांसाठी कांदा हा बंपर पीक म्हणून लाखोंची उत्पन्न देणार आहे. – हर्षद निगडे, तालुका कृषी अधिकारी

मागच्या वर्षी दर घसरल्याने अनेक शेतकऱ्यांचे न भरून येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकयांनी कांदा किरकोळ विक्री आठवडी बाजारात केला होता. यामुळे होणारे नुकसान काही प्रमाणात टळले होते. यंदा चांगला दर मिळत आहेत. – महादेव बिराजदार, भोसगे, शेतकरी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *