महाविकास आघाडीने राडा घडवून आणला; आम्ही ठरवले असते तर एकही मागे गेला नसता – नारायण राणे

Khozmaster
2 Min Read

मालवण : राजकोट किल्ल्याचे ठाकरे गटाने दगड पाडले ते माजी खासदार नीलेश राणे यांनी लावले. या पवित्र स्थळाचे दगड पाडणारे ठाकरे हे महाराज द्रोही आहेत. महाविकास आघाडीने हा राडा घडवून आणला.

आम्हाला जर काही करायचे असते तर यातील एकही मागे गेला नसता, अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतला. राजकोट येथील राड्यानंतर खासदार नारायण राणे माध्यमांशी बोलत होते.

राणे म्हणाले, आम्ही राजकोट किल्ला येथे जाऊन घटनेची पाहणी करून येत होतो. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वातावरण खराब करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर आम्ही आमच्या जागेवरच उभे राहिलो. यांनी एखादी शाळा तरी काढली का? मंदिर तरी उभारलं का? फक्त महायुती सरकारवर टीका करण्याचे काम करतात. स्वतःच्या वडिलांचा पुतळा सरकारी पैशाने बनविला त्या उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा ठेवणार? शिव्या घालण्यापलीकडे त्यांना काही माहिती नाही.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक भांडवल करीत आहेत. महाराजांचा पुतळा कोसळणे हे निमित्त करून सर्व जण एकत्र येऊन टीका करत आहेत. बाहेरून आलेले पुढारी, गेल्या आठ महिन्यांत पुतळा उभारल्यानंतर महाराजांच्या दर्शनाला आले नाही. आता पुतळा कोसळल्यानंतर केवळ राजकारण करून भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.

लवकरात लवकर नवीन पुतळा उभारू

महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट झाला. मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एक तरी उद्योग आणला का? अशा माणसाने टीका करण्याचे धाडस करू नये. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच लवकरात लवकर पुतळा उभारण्याचे प्रयत्न असतील, असे राणे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *