छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक कारण समोर

Khozmaster
2 Min Read

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याने राज्यभर पडसाद उमटले होते. शिवरायांचा पुतळा कसा कोसळला याबाबत आता चौकशी समितीचा अहवाल समोर आला आहे. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने राज्या सरकारकडे १६ पानी अहवाल सादर केला आहे. या अहवालातून धक्कादायक कारणं समोर आली आहेत.

चुकीच्या वेल्डिंग कामामुळे तसेच गंज आणि कमकुवत फ्रेममुळे ३५ फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर पुतळा उभारण्यात आल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नसल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. परिणामी पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता ज्यामुळे पुतळा कमकुवत झाला आणि कोसळला.मुंबईतील नेव्हल डॉकयार्डने भारतीय नौदल दिनानिमित्त जयदीप आपटे यांना कार्यारंभ आदेश दिला होता. पुतळ्याचा स्ट्रक्चर कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती. या बांधकामाची देखरेख भारतीय नौदलाने करणे अपेक्षित होते. मात्र, उद्घाटनानंतर देखभालीची जबाबदारी राज्य सरकारी यंत्रणांची असल्याचे भारतीय नौदलाने स्पष्ट केले.दरम्यान कोणत्याही पुतळ्याची योग्यरित्या पायाभरणी करणे महत्वाची असते आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागते. या प्रकरणात स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील यांनी बांधकाम विभागाकडून रीतसर परवानगी घेतल्याचे सूत्रांच्या माध्यमातून समजते. तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं स्ट्रक्चर योग्यरित्या बनवण्यात आलं नव्हतं. ज्यामुळे मुळ पुतळा उभारताना अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे देखील अहवालातून स्पष्ट झाले आहे.यासोबतच समितीतील तज्ज्ञांनी पुतळा कोसळण्याची अन्य काही कारणं देखील नमूद केली आहेत. मात्र त्यातून प्रामुख्याने या चूका कारणीभूत ठरल्या आहेत. तर चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले आहेत.

दरम्यान, राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २० कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *