वाद, प्रेमसंबधांतून सांगलीतील कबड्डीपटूच्या खून; दोघांना अटक, चौघा अल्पवयीन युवकांची सुधारगृहात रवानगी

Khozmaster
2 Min Read

सांगली : जामवाडीतील कबड्डीपटू अनिकेत तुकाराम हिप्परकर (वय २१) याच्या खूनप्रकरणी संशयित मंगेश ऊर्फ अवधूत संजय आरते (वय २७, रा. मरगूबाई मंदिराजवळ, जामवाडी) व जय राजू कलाल (१८, रा. पटेल चौक, सांगली) या दोघांना अटक केली आहे.

तर चौघा अल्पवयीन युवकांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मृत अनिकेतचे संशयित मंगेशच्या नात्यातील एका तरुणीशी असलेले प्रेमसंबंध आणि पूर्वीचा वाद यातून खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कबड्डीपटू अनिकेत याचे संशयित मंगेश याच्या नात्यातील एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. तसेच गतवर्षी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी संशयित मंगेश याच्या वाढदिवशी दोघांमध्ये वाद झाला होता. मृत आणि संशयित एकाच मंडळाचे खेळाडू होते. परंतु त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरूच होती. आठ दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच मंगेश याने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

त्याच्या सांगण्यावरूनच जय कलाल आणि चौघा अल्पवयीन युवकांनी मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास मरगूबाई मंदिराजवळ अनिकेतवर हल्ला चढवला. त्याच्या पाठीवर, डोक्यात, कंबरेवर वार केले. हल्ल्यात तो मृत झाल्यानंतर सहाजण पसार झाले.

खुनानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे व पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हलवली. गुन्हे प्रकटीकरणचे पथक शोध घेत असताना पोलिस अंमलदार संतोष गळवे, गौतम कांबळे यांना संशयित नदीकाठाजवळ लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने तिकडे धाव घेतली. परिसरात पाठलाग करून सहाजणांना ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात मुख्य सूत्रधार मंगेश असल्याचे स्पष्ट झाले, तर हल्लेखोर पाचजण अल्पवयीन असल्याचे समजल्यानंतर त्याना ताब्यात घेतले. बुधवारी सकाळी त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली. चौकशीत जय कलाल याला १८ वर्षे पूर्ण झाल्याचे समजल्यानंतर त्याला सायंकाळी ताब्यात घेतले, तर अटकेतील मंगेशला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.

निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक केशव रणदिवे, प्रमोद खाडे, महादेव पोवार, अंमलदार विनायक शिंदे, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, संदीप कुंभार, योगेश सटाले, पृथ्वी कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

अल्पवयीन पडताळणीत झाला सज्ञान

मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून पाच अल्पवयीन युवकांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यांना ताब्यात घेऊन सुधारगृहात रवानगी केली. परंतु जय कलाल याचे आधार कार्ड मिळाल्यानंतर त्याला १८ वर्षे आणि पाच महिने पूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला सायंकाळी सुधारगृहातून ताब्यात घेत अटक केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *