मुंबईतील चांदिवली विधानसभा मदारसंघातील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांना सदनिकांमध्ये कायमस्वरूपी हक्काची घरे देणारा चावी वाटप सोहळा आज पार पडला. यावेळी स्थानिकांशी संवाद साधून माझे मनोगत व्यक्त केले.
चांदीवलीमधील मिठी नदीशेजारील आणि विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील प्रकल्प बधितांना यापूर्वी ३ हजार ६०० घरे देण्यात आली होती. त्यातील उर्वरित ४०० प्रकल्प बधितांना आज हक्काची घरे मिळत असल्याबद्दल आनंद आणि समाधान याप्रसंगी व्यक्त केले. आमदार दिलीप मामा लांडे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून आगामी निवडणुकीत त्यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले.
मुंबईतील सर्वसामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, शहरातील रखडलेले एसआरएचे प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी सिडको, एमएमआरडीए, एमएसआरडिसी, एमआयडीसी, मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातील रमाबाई नगर, कामराज नगर मधील रहिवाशांना दोन वर्षांच्या भाड्याचे वाटप आज केले असून १६ हजार ५०० घरे तिथे उभारली जाणार असल्याचे सांगितले.
मी स्वतः चाळीत राहिलो आहे, गरीबी काय असते ते मला ठाऊक आहे. त्यामुळे गरिबांच्या अडचणी सोडवणे याला मी कायम प्राधान्य दिले आहे. मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त व्हावे अशी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती, मात्र आमच्या आधी मुख्यमंत्री असलेले त्यांच्या सुपुत्राने याला कधीच प्राथमिकता दिली नाही त्यामुळे आमचे सरकार आल्यावर आम्ही झोपडपट्टी पुनर्विकासाच्या कामाला वेग दिला आहे असे यासमयी स्पष्ट केले.
सर्वसामान्य महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणणारे हे आपले सरकार आहे. या योजनेची मुदत आम्ही वाढवली आहे, दुसरीकडे ही योजना सुरू राहण्यासाठी विरोधक नागपूर कोर्टात गेले आहेत. काहीही झालं तरीही ही योजना बंद होणार नाही, उलट सरकारचे हात बळकट केल्यास त्यात वाढच होईल असे निक्षून सांगितले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार दिलीपमामा लांडे, माजी नगरसेवक किरण लांडगे, युवासेना अधिकारी प्रयाग लांडे उपस्थित होते.