पाणंद रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च झाल्याची अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली कबुली
एकही रुपया खर्च न झाल्याचा आमदार व तहसीलदारांचा खोटा दावा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी : राहुलभाऊ बोंद्रे
- न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे…
- शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे आवाहन….
चिखली दिनांक- ८ सप्टेंबर २०२४
चिखली विधानसभा मतदारसंघात मातोश्री ग्रामसमृध्दी शेत –पाणंद रस्ते योजनेच्या कामात ५६ कोटी रुपायांचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती पत्रकारपरिषदेत देवून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी वायरल झालेली ऑडिओ क्लिप जनतेसमोर आणली. या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली होती. यानंतर आ. श्वेता महाले यांनी पत्रकार परिषद घेवून पाणंद रस्त्यावर चिखली व बुलढाणा तालुक्यात एक रुपयाही खर्च न झाल्याचा दावा केला होता. मात्र मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी माहिती अधिकारात जिल्हाधिकारी बुलढाणा यांना माहिती मागितली असता जिल्हाधिकाऱ्यांनी पाणंद रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च झाल्याची लेखी कबुलीच दिली आहे. चिखली व बुलढाणा तालुक्यात रस्ता निहाय पाणंद रस्त्यांवर किती रुपये खर्च झाले याचा तक्ता सादर केलेला आहे. मजूरांच्या माध्यमातून अनेक गावात काम न करता अकुशलवर कोट्यावधी रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याने आमदार महाले यांचा एकही रुपया खर्च न झाल्याचा दावा खोटा व शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
चिखली मतदार संघात मातोश्री ग्रामसमृध्दी शेत –पाणंद रस्ते योजने अंतर्गत सुरु असलेल्या व पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये आतापर्यंत अदा केलेल्या अकुशल कामाच्या रकमे संदर्भात रस्ता निहाय माहिती माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारात मागितली. त्यानुसार चिखली तालुक्यात ५६ व बुलढाणा तालुक्यात ४० पाणंद रस्त्यांवर कोट्यावधी रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की, प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कामे न करता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजूरांच्या नावावर चिखली तालुक्यातील ५६ व बुलढाणा तालुक्यातील ४० रस्त्यांची बीले काढण्यात आली आहेत. परिणामी पाणंद रस्त्याची वाट बिकट झाली असून शेतकऱ्यांना चिखल तुडवत असंख्य जीवघेण्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे आवाहन….
शेतकऱ्यांच्या शेताची रक्तवाहिनी म्हणून पाणंद रस्त्याचे महत्व अधोरेखित होते. रस्त्यावरची झाडे तोडणे, काळी माती अडीच फुट खोदकाम, कच्चा मुरूम खोदकाम, पक्का मुरूम आणून टाकणे, दबाई करणे, या कामांसाठी हा खर्च झाला असे दाखविण्यात आले असून पैसे मजुरांच्या नावाने काढण्यात आलेली आहेत. चिखली तालुक्यातील ५६ व बुलढाणा तालुक्यातील ४० रस्त्यांवर किती रुपये काढलेत याची यादी जनसेवा कार्यालय जयस्तंभ चौक चिखली येथे उपलब्ध आहे. दर्शविलेल्या कामांवर अकुशल वर खर्च दाखवून कामे न करताच बिले काढण्यात आली अशी शंका असेल तर पाणंद रस्त्यात अशा दिशाभूल झालेल्या शेतकऱ्यांनी जनसेवा कार्यालयात तक्रार करावी असे आवाहनही राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले आहे.
न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे…
पाणंद रस्त्याच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेऊन कोट्यावधी रुपये खर्च झालेले असताना आमदार तहसीलदाराचा हवाला देऊन एकही रुपया खर्च नाही झाला असं धडधडीत खोटं सांगतात. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार लपवत असल्याचे संशयाची सुई त्यामुळे त्यांच्याकडे जाते. पंचवीस लाख रुपयांचा रस्ता सहा लाख रुपयात करून घ्या, रोजगार हमी कार्यालय आम्ही मॅनेज करू असं बोलत असताना आमदाराचा भाचा ओम वायाळ याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. चिखली मतदार संघातील ३५० पाणंद रस्तांच्या कामात अनियमितता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या मापदंडा प्रमाणे त्यांचे काम पूर्ण झाले नाही. यामध्ये ५६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, परिणामी शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला नसल्याचे विदारक चित्र आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे यांनी केली आहे.
Users Today : 138