३७० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या स्मृतींना राज्य सरकार देणार उजाळा
चिखली –
विद्याधर महाले यांनी चिखली तालुक्यातील करवंड येथे होणाऱ्या ‘करवंड महोत्सवा’च्या पूर्वतयारीची पाहणी करत हा महोत्सव केवळ सरकारी कार्यक्रम न राहता जनसामान्यांचा ‘लोकोत्सव’ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला यंदा ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १५ व १६ एप्रिल रोजी करवंड येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी नुकताच दौरा केला. त्यांनी या महोत्सवात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असावा, असे सांगितले.
महोत्सवानिमित्त ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणासाठी १९ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता ‘महा-श्रमदान’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत करवंड महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी जिल्ह्यातील युवक, शिवभक्त, धारकरी तसेच विविध सामाजिक मंडळांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची संपूर्ण जिल्हा टीम सक्रिय सहभाग घेणार असून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि स्वच्छता हे आपले ‘परम कर्तव्य’ म्हणून पार पाडले जाणार आहे.
दरम्यान, या महोत्सवासाठी श्वेता महाले यांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. स्थानिक युवकांनी केलेल्या श्रमदानाचे विद्याधर महाले यांनी विशेष कौतुक केले.
३७० वर्षांपूर्वी ज्या विवाह सोहळ्यात आपल्या पूर्वजांनी सहभाग घेतला होता, त्या परंपरेचे वारसदार म्हणून आजच्या पिढीनेही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक स्थळाची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी अरविंद देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल साठे, प्राचार्य अण्णासाहेब म्हळसणे, प्रा. विजय घ्याळ, भास्करराव अडाळकर, सचिन गरड, अनिल सपकाळ, गजानन पवार तसेच असंख्य गावकरी आणि शिवप्रेमी उपस्थित होते. 🚩👏
Users Today : 129