नागपूरमध्ये तीन अपघात घडले. त्यामुळे रविवार अपघातवार ठरला. तीन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील कर संकलकासह दोन जण ठार तर दोन विद्यार्थी जखमी झाले.पहिली घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नामदेवनगर पुलाजवळ घडली. भरधाव ट्रकनं (सीजी-०४-एलझेड-४७१७) मोपेडला (एमएच-४९-एबी-४७७३) धडक दिल्याने मुलांसमोरच वडील ठार झाले, तर दोन मुले जखमी झाली. प्रफुल्ल तेजरामजी लांजेवार (वय ४० रा. वैभवलक्ष्मीनगर, कळमना), असे मृतकाचं नाव आहे. जखमींमध्ये ओजस (वय १३) व निशांत (वय ८) यांचा समावेश आहे. दोघांपैकी एकाचा उजवा हात या अपघातात निकामी झाल्याची माहिती आहे.प्रफुल्ल हे जिल्हाधिकारी कार्यालयात कर संकलक होते. ओजस व निशांत हे दोघे रविवारी सकाळी अबॅकसच्या शिकवणीला गेले. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमरास प्रफुल्ल हे दोघांना मोपेडने घेऊन घरी जात होते. नामदेवनगर पुलाजवळ ट्रकने मोपेडला धडक दिली. ट्रकचं मागील चाक प्रफुल्ल यांच्या अंगावरुन गेलं. गंभीर जखमी झाल्यानं प्रफुल्ल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ओजस व निशांत जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रक सोडून थेट यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी चालक संदीप लखन भुरीया (वय २५, रा.मालनवाडा,सिवनी) याला अटक केली. पोलिसांनी जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.