भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आपल्याला मुख्यमंत्री करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याचं वृत्त समोर आलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अशी मागणी दादांनी केल्याची माहिती आहे.मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी अमित शाह यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे. द हिंदू वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्यातून दिलेल्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात दिल्लीत महायुतीतील प्रमुख नेत्यांची आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे. राज्यातील किमान २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत करावी, अशी भाजप नेत्यांनी अमित शहांकडे मागणी केली.सूत्रांच्या माहितीनुसार मागील पंधरा-वीस दिवसापासून अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेत जवळपास ४० जागांसाठी चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास तयार नसून तीन ते चार जागा संदर्भात अदलाबदल करण्यास तयार आहे. त्याचबरोबर काँग्रेस जिथे लढत आहे अशा दहा ते बारा जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्याची माहिती आहे.