वसंत चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची शिफारस; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेड जिल्हा काँग्रेसचा एकमताने ठराव

Khozmaster
1 Min Read

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात नजीकच्या काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र प्रा.रवींद्र चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी, असा ठराव नांदेड जिल्हा व महानगर काँग्रेसच्या तीन शाखांच्या संयुक्त बैठकीत सोमवारी करण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबत नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून त्यासाठी भाजपामध्ये उमेदवारीसाठी काही नावे समोर येत असताना काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांची भूमिका आणि कल वरील बैठकीत स्पष्ट झाला. प्रा.रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा प्रस्ताव नांदेड जिल्हा उत्तर विभाग काँग्रेसचे अध्यक्ष बी.आर.कदम यांनी मांडला तर त्यास दक्षिण विभागाचे अध्यक्ष हणमंतराव बेटमोगरेकर व महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी अनुमोदन दिल्यावर तो सर्वानुमते आणि इतर कोणत्याही पर्यायाविना पारित झाला.

वसंतराव चव्हाण यांच्या निवडणुकीतील प्रचार व इतर सर्व बाबींचे नियोजन रवींद्र यांनी केले होेते. मधल्या काळात त्यांनी पक्षाकडे नायगाव विधानसभेसाठी अर्ज केला होता, पण आकस्मिक झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर पक्षातर्फे रवींद्र यांनी पोटनिवडणूक लढवावी, अशी भूमिका काँग्रेस संघटनेने घेतली असून त्यांच्या नावाची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली जाणार असल्याचे प्रदेश सचिव श्याम दरक यांनी बैठकीनंतर सांगितले. काँग्रेस पक्षाच्या बैठकीत प्रारंभी वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोसीकर यांनीही या बैठकीत रवींद्र चव्हाण हेच पक्षाच्या उमेदवारीचे हक्कदार ठरतात, असे नमूद केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *