आधार कार्डवर खाडाखोड, लाडक्या बहिणींचे पैसे भावांच्या खात्यात; लाखोंचा घोटाळा उघडकीस

Khozmaster
2 Min Read

नांदेड: महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात न जाता पुरुषांच्या खात्यात गेल्याचा आणि ते पैसे सीएससी चालकानं परस्पर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. नांदेडच्या हदगावमध्ये घडलेल्या या अपहारानं पोलीस प्रशासन चक्रावून गेलं आहे. लाखोंचा घोटाळा करुन लाडक्या बहिणींसोबत त्यांच्या पतींची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक पसार झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन मल्टीसर्व्हिसेस अँड झेरॉक्स सेंटर चालकानं रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले असल्याचं सांगून त्याच्या परिचयातील पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रं गोळा केली. लाडकी बहिणसाठी अर्ज करताना त्यानं महिलांच्या आधार कार्डचे नंबर टाकण्याऐवजी पुरुषांचे आधार कार्ड नंबर टाकले. त्यांचे बँक खाते क्रमांकही दिला. पैसे खात्यात जमा होताच, रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचं सांगून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम काढली. ‘लोकमत’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

पितळ कसं उघडं पडलं?
मनाठामध्ये राहणाऱ्या अलीम सलीम कादरी यांच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे घोटाळा उघडकीस आला. गावात बोभाटा झाला. मनाठा गावातील ३८, तर बामणी फाटा येथील ३३ पुरुषांचे आधार क्रमांक वापरुन तब्बल ३ लाख १९ हजार ५०० रुपये काढण्यात आले. ही रक्कम घेऊन केंद्रचालक फरार झाला आहे.अलीम सलीम कादरी यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येताच त्यांनी केंद्र चालकाला फोन केला. घडलेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. तेव्हा कोणाला काही सांगू नका. काही होत नाही, असं उत्तर सेंटर चालकानं दिलं. तुमची कागदपत्रं परत करतो, असं सांगून तो सेंटरला कुलूप लावून परागंदा झाला.

जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही योजनेची रक्कम अशा प्रकारे उचलणं गुन्हा आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांची नावं कशी घेतली गेली? यात कोणाकोणाचा सहभाग ते चौकशीतून समोर येईल. दोषींसह संबंधित केंद्र चालकांवर कायदेशीररित्या गुन्हादेखील दाखल करण्यात येईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *