नांदेड : पिण्याच्या पाण्यातून बाधा झाल्यामुळे नांदेडजवळील नेरली गावामध्ये ३५० ते ४०० जणांची प्रकृती बिघडली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या दुर्घटनेत ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने मध्यरात्री राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.नेमकं काय घडलं?
नांदेडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नेरली गावात ग्रामपंचायतच्यावतीने पाणीपुरवठा केला जातो. नियोजित वेळेनुसार शुक्रवारी सकाळी पाणी सोडण्यात आले. गावातील बहुतांश लोक कामानिमित्त नांदेडला जातात. दुपारनंतर गावातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना त्रास जाणवू लागला. काही जणांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत होता. सुरुवातीला पावसामुळे काही आजार जाणवत असल्याचा अंदाज होता; मात्र रात्री ११ वाजतानंतर रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख रात्रीच पथकासह नेरली गावात दाखल झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर शासकीय रुग्णालय तसेच लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना नेरली येथे बोलावण्यात आले. सुमारे २५पेक्षा अधिक रुग्णवाहिका गावात दाखल झाल्या. आरोग्य अधिकाऱ्यांनी गावातच प्राथमिक उपचार करून गंभीर रुग्णांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले. विविध पक्षांच्या नेत्यांनीही मदतीसाठी धाव घेतली. सध्या २००पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यांच्या जीवीतास धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.दरम्यान हे प्रकरण का घडले? कोणाच्या हलगर्जीपणामुळे घडले? याची चौकशी करुन दोषीविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
पिण्याच्या पाण्यातून चारशे जणांना बाधा; नांदेडजवळील नेरली गावातील धक्कादायक घटना
Leave a comment