६५ वर्षाच्या सुखी संसारानंतर वृद्ध दांम्पत्याची एकाच वेळी अंत्ययात्रा; पतीच्या निधनानंतर पत्नीने अवघ्या ७ तासात सोडले प्राण

Khozmaster
2 Min Read

नांदेड  : ६५ वर्षाचा दोघांचा सुखी संसार…मात्र आजारामुळे पतीने साथ सोडली. त्यातच विरहात असलेल्या पत्नीने ही पतीच्या निधनाच्या सात तासाच आपले प्राण सोडले. मन हेलावून लावणारी ही घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा गावात घडली. दोघांची अंत्ययात्रा एकाच वेळी काढून गावकऱ्यांनी वृद्ध दांम्पत्याला शेवटचा निरोप दिला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.गंगाराम मल्लू नागधरे ( वय ८५) आणि महादाबाई गंगाराम नागधरे (वय ८२) असं वृद्ध दांम्पत्याच नाव आहे. या वृद्ध दांम्पत्यानी ६५ वर्ष सूखी संसार केला. त्यांना दोन मुलं आणि चार मुली अशी आपत्य झाली. काबाडकष्ट करून मुलांना शिकवले आणि त्यांचे लग्न देखील केले. मात्र दोघांचेही वय झाल्याने त्यांचे शरीर थकले होते. त्यात गंगाराम हे काही दिवसांपासून आजारी पडल्याने अंथरुणाला खिळले होते. अशा परिस्थितीत ही पत्नी महदाबाई यांनी सेवा केली. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गंगाराम नागधरे यांची प्राणज्योत मावळली.६५ वर्षाच्या संसारानंतर पतीने साथ सोडल्याने त्यांची पत्नी देखील दुखात होती. संपूर्ण कुटुंबीय शोककळेत होतं. याच दरम्यान पतीच्या विरहात असलेल्या महादाबाई यांनी देखील मंगळवारी पहाटे श्वास सोडला. जणू सोबत जगायची आणि सोबत मरण्याची शपथ त्यांनी घेतली होती आणि निभावलीही. दोघांची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली. एकत्रच दोघांना अखेरचा निरोप देखील देण्यात आला. या दुःखद घटनेने बरबडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयुष्यभर निभावली एकेमकांची साथ
गंगाराम नागधरे आणि महादाबाई नागधरे यांनी ६५ वर्षांपूर्वी लग्नाच्या वेळी एकेमकांना साथ देण्याचं दिलेलं वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळल. या ६५ वर्षांच्या काळात त्यांच्यावर अनेक संकटे आली, पण त्यांच्या संसाराची गाठ शेवटच्या श्वासापर्यंत नियतीही तोडू शकली नाही.प्रत्येक सुखदुःखात दोघांनी एकमेकांना साथ दिली. प्रत्येक अडचणीचा मिळून सामना केला. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली,नातू, पणतू असा परिवार आहे. ,थोरला मुलगा केंद्रीय पोलीस दलातून सेवानिवृत्त आहे. दोन्ही मुले आता शेती सांभाळत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *