बुलडाणा,(जिमाका),दि.10 : सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन, प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या तक्रारींचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी ‘आपले सरकार पोर्टल २.०’ ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहीत कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिल्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार , अपर पोलीस अधीक्षक खान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ, प्रशिक्षक देवांग दवे, विनोद वर्मा, बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील, सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे, मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे , तहसिलदार संजीवनी मुपडे यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टलबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशाप्रकारे करावा, याबाबत प्रशिक्षक देवांग दवे यांनी माहिती दिली. या माहितीचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून, गावातूनच शासन, प्रशासनापर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल तक्रार निवारण प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
ज्वारी खरेदी नोंदणीसाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
बुलडाणा,(जिमाका),दि.10 : हमी दराने भरडधान्य ज्वारी खरेदीसाठी पुरेशी नोंदणी झालेली नाही. शासनाकडून भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन शेतकरी नोंदणी साठी दि. 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांचे हमी दराने भरडधान्य ज्वारी नोंदणीसाठी यापुर्वी दि. 31 ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतू मागील हंगामामधील ऑनलाईन शेतकरी नोंदणी आणि रब्बी हंगाम २०२३-२४ मधील शेतकरी नोंदणी पाहता रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये भरडधान्य खरेदीकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पुरेशी झाली नाही. त्यामुळे शासनाकडून भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी दि. ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर लाभ योजना मयत वारस कर्ज खात्याबाबत
बुलडाणा,(जिमाका),दि.10 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच निधन झाल्याने त्यांना प्रोत्साहन लाभ रक्कम अदा करता आलेली नाही, अशा मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत महा-आयटीकडून आदर्श कार्यपध्दती प्राप्त झालेली आहे.
मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरून काढून टाकण्याची सुविधा बँकांना दि. 17 स्पटेंबर 2024 पर्यत कालावधीत उपलब्ध राहील. मयत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद संबंधीत कर्जखात्यास करुन त्याबाबतची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करण्याची सुविधा दि. 18 सप्टेंबर 2024 ते दि. 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत उपलब्ध राहील. तथापि प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे संबंधीत बँकेकडे विहीत कालावधी मध्ये जमा करावी. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही, अशा शेतक-यांनी संबंधीत बँक शाखांशी संपर्क साधुन दि. 18 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरण पुर्ण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलढाणा यांचे मार्फत करण्यात येत आहे.
धार्मिक कार्यासाठी गंगाजल : आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये
बुलडाणा,(जिमाका),दि.10 : डाक विभागामार्फत धार्मिक कार्यात,सणवारामध्ये उपयुक्त असे पवित्र गंगाजल आपल्या डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. डाक विभागामार्फत खास गंगोत्री येथून सदर गंगाजल व्यवस्था केली जाते. गंगाजल फक्त रु.35 रुपये प्रती बॉटल (200 मीली) प्रमाणे बुलढाणा आणि खामगाव मुख्य डाक घर येथे उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी डाक विभागाच्या या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मा. डाक अधीक्षक, गणेश अंभोरे, बुलडाणा विभाग, बुलडाणा यांनी केले आहे.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थी भरती मेळावा.
बुलडाणा,(जिमाका),दि.10 : तरुणांना शिक्षणा नंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळावे व त्यांना रोजगार मिळण्याची संधी वाढावी या साठी राज्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. यातुन उद्योजक, खाजगी अस्थापना, सेवा क्षेत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय तसेच निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव, जि. बुलढाणा, येथे दि. 24 सप्टेंबर 2024 व ANS Infovally खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव, जि. बुलढाणा, येथे दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरती मेळाव्यामध्ये शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांना आमंत्रीत करण्यात येत आहे. सदर मेळाव्या मध्ये सहभागी होण्याकरीता उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा . वय 18 ते 35 वर्ष असणे गरजेचे आहे. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण व कमाल पदव्युत्तर पदवी धारक असावा. उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर नोंदणी करावी व वरील नमूद असलेल्या तारखेस संबंधित स्थळी उपस्थित राहून ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था खामगाव चे प्राचार्य तथा मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, खामगाव चे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. डी. गंगावणे यांनी केले आहे
Users Today : 0