एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली आणि काही दिवसांतच मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची मागणी झाली. राजकीय प्रघातानुसार एखाद्या आमदाराच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना तिकीट दिल्यास त्याविरोधात उमेदवार न देण्याचा संकेत पाळला जातो. परंतु भाजप नेते मुरजी पटेल या जागेसाठी अडून बसल्याने त्यांनी उमेदवारी अर्जही भरला. अखेर, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने त्यांना सूचना देत माघार घ्यायला लावली आणि अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध झाली.२०२२ मध्ये म्हणजेच दोन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेला उजाळा देण्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक. दोन वर्षांपूर्वी हुकलेली संधी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप नेते मुरजी पटेल उत्सुक आहेत. त्यांनी पुन्हा अंधेरी पूर्वच्या जागेवर दावा सांगितला आहे. परंतु अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महायुतीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. अंधेरी पूर्वेला शिवसेना (ठाकरे गटाचा) आमदार आहे. त्यामुळे युतीत ही जागाही सेनेला जाणार, की भाजप खेचून घेणार, हे स्पष्ट नाही. या पार्श्वभूमीवर भाजप इच्छुक मुरजी पटेल यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. खरं तर शिवसेनेत नुकत्याच प्रवेश केलेल्या स्वीकृती शर्माही या जागेसाठी इच्छुक आहेत. त्या एन्काऊण्टर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे महायुतीत रस्सीखेच अटळ आहे.मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. अंधेरी भागात त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे. मुरजी पटेल यांच्या पत्नी केशरबेन २०१२ मध्ये काँग्रेसकडून नगरसेविका होत्या. २०१५ मध्ये पटेल दाम्पत्याने काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केला. त्यानंतर २०१७ ची महापालिका निवडणूक जिंकलीही, परंतु २०१८ मध्ये बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात दोघांचंही नगरसेवकपद रद्द झालं.