येत्या १५ सप्टेंबरपासून नागपूर- सिकंदराबाद वंदेभारत एक्स्प्रेसला प्रारंभ होणार असून, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक त्यासाठी नागपुरात येणार आहेत. या गाडीमुळे आता नागपुरातून धावणाऱ्या ‘वंदेभारत’ची संख्या तीन होणार आहे. या रेल्वेगाडीसाठीचे कोच नागपूरकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे.
नागपूर-सिकंदराबाद या मार्गावर प्रवाशांची संख्या खूप आहे. त्यामुळे या मार्गावर वेगवान रेल्वेगाडीची गरज होती. ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपुरातून पहिली वंदेभारत एक्सप्रेसला बिलासपूरला रवाना झाली होती. या गाडीला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात आले होते. नंतरच्या काळात नागपूर-इंदोर ही ‘वंदेभारत’ ही सुरू करण्यात आली. आता सिकंदराबादसाठी तिसरी रेल्वेगाडी सुरू होणार आहे. सुत्रांनुसार, नागपूर-सिकंदराबाद रेल्वेगाडी नागपूरवरून पहाटे ५ वाजता सुटेल वदुपारी १२.१५ वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे सिकंदराबादवरून दुपारी १ वाजता निघून रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचेल. सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशा, रामगुंडम, काझीपेठ येथे या रेल्वेगाडीचे थांबे असणार आहेत.नागपूर-पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या पाहता या मार्गावर स्लिपर ‘वंदेभारत’ सुरू करावी, असा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच पाठविला होता. नागपूर- पुणे दरम्यानचे अंतर पाहता या मार्गावर चेअर कार शक्य नाही. त्यामुळे स्लिपर कोच असलेली रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी आहे. १५ सप्टेंबर रोजीच याही रेल्वेगाडीची घोषणा होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबाबत आमच्याकडे कुठलीही अधिकृत माहिती आली नसल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.अजनी रेल्वे स्थानकावरील विकासकामांमुळे १२ सप्टेंबर ते २ डिसेंबर २०२४ असे ९० दिवस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ बंद ठेवण्यात येणार असल्याने अजनी-पुणे एक्स्प्रेससह काही गाड्या नागपूर स्थानकावर हलविण्यात आल्या आहेत. १२ सप्टेंबरपासून अजनी-पुणेची नागपूरवरून सुटण्याची वेळ १९.४० वाजता अशी राहील.