आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीतील जागावाटपावरुन सुरु असलेला संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेने एकूण २८८ जागांपैकी १०० ते १०५ जागांवर दावा केला आहे, तर भाजप १६० मतदारसंघात उमेदवार उभे करुन २०१९ पेक्षा अधिक जागा जिंकण्यास उत्सुक आहे. तर ६० ते ८० जागा जिंकण्याचे राष्ट्रवादीचे लक्ष आहे. ही स्थिती पाहता ४० ते ५० जागांवर दोन पक्षांत किंवा तिन्ही पक्षांत रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. यावेळी महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या. शिवसेनेने शाहांकडे १०० हून अधिक जागांची मागणी केल्याचे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. शाहांसमोर लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबद्दल तसेच अखंड शिवसेनेच्या परफॉर्मन्सबद्दल सादरीकरण देण्यात आले, असेही सांगण्यात आले.आम्ही मराठी आणि हिंदुत्ववादी मतं टिकवून ठेवली आहेत. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला स्वतःची फारशी मतं मिळाली नाहीत; इंडिया आघाडीसाठी धोरणात्मक मतदान झाल्यामुळे त्यांना मते मिळाली. शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या तरच आम्ही ठाकरे गटाचा सामना करु आणि महाविकास आघाडीला पराभूत करु शकतो, असेही शिंदेंनी शाहांना सांगितल्याची माहिती आहेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यातच जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाऊ शकतो. विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले, तरीही सूत्र आधीच ठरवले जाऊ शकते. शिवसेनेला ८० ते ९०, तर राष्ट्रवादीला ५० ते ६० जागा मिळू शकतात. तसे झाल्यास भाजप १४० च्या आसपास जागा लढेल.दरम्यान, भाजपने २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृत्ताचे खंडन केले.